मनोहर कुंभेजकर
मुंबई - सार्वजनिक फूड बँक फ्रीजची सुविधा वर्सोवा येथे सुरू करण्यात आली असून मुंबईतील हा पहिला उपक्रम आहे. वर्सोवा यारी रोड येथील शिवसेना शाखा क्रमांक 59 जवळील सार्वजनिक फूड बँकच्या फ्रीजचे उद्घाटन शिवसेना नेते व खासदार गजानन कीर्तिकर यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री करण्यात आले. शिवसेना शाखा क्र. 59 आणि चिल्ड्रेन्स वेल्फेअर सेंटर हायस्कूलचे प्राचार्य व शिक्षण तज्ञ अजय कौल यांच्या संयुक्त विद्यमाने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सार्वजनिक फूड बँक फ्रीज या मोफत सेवेच्या माध्यमातून विभागातील नागरिकांना किंवा परिसरातील हॉटेलमधील उरलेले ताजे अन्न फेकून न देता ती गरीबांसाठी अन्न दान करावयाची असल्यास ते फ्रीजमध्ये ठेवून दान करू शकतात. त्यामुळे विशेष करुन रात्रीच्या वेळी कोणी उपाशी असेल आणि त्याला अन्नाची आवश्यकता असेल तर या फूड बँकेचा चांगला फायदा होईल अस गजानन कीर्तिकर यांनी सांगितले आणि या सेवेचे कौतुक केले. 4 सेवा केंद्रे लवकरच वर्सोवा विधानसभा परिसरात सुरू करणार असल्याची माहिती अजय कौल यांनी लोकमतशी बोलताना दिली. मुंबईत प्रथमच सुरू होत असलेल्या अशा सेवेच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य अजय कौल, शिवसेना उपविभाग प्रमुख राजेश शेट्ये, स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, शाखाप्रमुख सतिश परब, चित्रपट निर्मात्या शबनम कपूर, प्रशांत काशीद व विभागातील शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.