सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा दर्शन केवळ ऑनलाईन, सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 04:36 AM2020-07-12T04:36:33+5:302020-07-12T06:25:13+5:30

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. मर्यादित असा मंडप उभारता येईल.

Public Ganeshotsav Darshan this year only online, guidelines issued by the government | सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा दर्शन केवळ ऑनलाईन, सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदा दर्शन केवळ ऑनलाईन, सरकारने जारी केल्या मार्गदर्शक सूचना

googlenewsNext

मुंबई : राज्यात सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने शनिवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात सार्वजनिक मंडळांसाठी गणपतीची मूर्ती चार फूट, तर घरगुती गणपतीची मूर्ती दोन फुटापर्यंत असावी, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आॅनलाईन दर्शनाची सोय करावी, असे म्हटले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी आवश्यक राहील. मर्यादित असा मंडप उभारता येईल. सार्वजनिक व घरगुती गणपतीची सजावट भपकेबाज नसावी. शक्यतो पारंपरिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू/संगमरवर मूर्तीचे पूजन करावे, मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी ते करावे. मूर्तींचे विसर्जन पुढे करणे शक्य असल्यास ते माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा २०२१ च्या भाद्र्रपदात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून आगमन व विसर्जनावेळी गर्दीत जाणे टाळून आपले कोरोनापासून रक्षण करता येईल, असे गृह विभागाच्या सूचनांमध्ये म्हटले आहे. उत्सवासाठी वर्गणी देणगी स्वच्छेने दिल्यास  त्याचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, असे पाहावे, तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.
आरोग्य उपक्रमांना प्राधान्य द्या
सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे यांचे आयोजन करावे. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमात गर्दी होणार नाही तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.
श्रीगणेश दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची पुरेशी व्यवस्था करावी, असेही गृह विभागाने म्हटले आहे.
सर्व पालिकांनी आता यानुसार आपापल्या क्षेत्रातील स्थितीचा अभ्यास करून परवानगी द्यायची आहे.

- गणरायाचे आगमन व विसर्जन मिरवणूक काढण्यात येऊ नये.
- विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे.
- लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
- संपूर्ण चाळीतील इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये.
- महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था लोकप्रतिनिधी,संस्था आदींच्या मदतीने विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

घरगुती गणेशोत्सवावर निर्बंध नको
पुणे : घरगुती गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांनी गणेशमूर्ती आणू नयेत अशी भूमिका प्रशासनातील अधिकारी मांडत असतील
तर ते अत्यंत चुकीचे आहे. लोकांच्या घरापर्यंत जाणे अशोभनीय असून नागरिकांच्या भावनांशी खेळू नये अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.

Web Title: Public Ganeshotsav Darshan this year only online, guidelines issued by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.