सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा उत्सव साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:09 AM2021-09-14T04:09:33+5:302021-09-14T04:09:33+5:30
मुंबई : सध्या गणपती उत्सवावर कोरोना विघ्न आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहेत. गणेशोत्सवामध्ये ...
मुंबई : सध्या गणपती उत्सवावर कोरोना विघ्न आहे. मात्र अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करत आहेत. गणेशोत्सवामध्ये पहिल्यासारखा उत्साह दिसून येत नाही आहे. परंपरा जपण्यासाठी साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जात आहे.
मंडळे कसा करतात गणेशोत्सव साजरा
१) दादरचा राजा
सध्या दादरच्या राजा गणपतीचे ८३ वे वर्ष आहे. सध्या गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न आहे. सरकारच्या नियमानुसार या वर्षीदेखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील गणपतीची शाडूची मूर्ती असते. कोरोनामुळे या वर्षी वर्गणी घेण्याचेदेखील टाळले आहे. जे स्वखुशीने वर्गणी देतात ती वर्गणी घेतली जाते. पहिल्याप्रमाणे जास्त भाविक दर्शनासाठी येत नाहीत. सगळीकडे शुकशुकाट आहे. शशिकांत सावंत म्हणाले की, सध्या शासनाच्या नियमानुसार आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. कोरोनाचे विघ्न तर गणेशोत्सवावर आहे. आपली परंपरा तर जपली गेली पाहिजे.
२) राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
राम मारुती रोड सार्वजनिक गणेशोत्सवाचे या वर्षी ७६ वे वर्ष आहे. दरवर्षी दादरच्या पहिल्या मानाच्या गणपतीचे स्वागत मोठ्या थाटामाटात केले जाते, मात्र दोन वर्षे कोरोनाचे संकट गणेशोत्सवावर आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे शुकशुकाट आहे. कोरोनापूर्वी गणेशोत्सव थाटामाटात साजरा होत होता. अनेक देखावे, चलचित्रे, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होत असत, मात्र या वर्षी उत्सव शासनाच्या नियमानुसार साजरा होत आहे.
३) टायकलवाडी गणेशोत्सव मंडळ
टायकलवाडी गणेशोत्सव मंडळाचे या वर्षी ३८ वे वर्ष आहे. कोरोनाच्या आधी गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होत असे, मात्र ही दोन वर्षे कोरोनाचे संकट कायम असल्याने या वर्षीदेखील उत्सव साधेपणाने केला जात आहे. दरवर्षी बाप्पाच्या दर्शनासाठी वेगवेगळे देखावे, चलचित्रे असतात. लोकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम भरवले जातात, मात्र या वर्षी सगळीकडे सामसूम आहे. दरवर्षी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत, मात्र सध्या भाविकांची गर्दी दिसत नाही, सगळीकडे शुकशुकाट आहे. कार्यकर्ते चेतन गावठे म्हणाले की, सध्या अगदी साधेपणाने गणेशोत्सव साजरा होणार आहे. तसेच शासनाचे नियम पाळून उत्सव साजरा केला जाईल.
४) श्री गणसिद्धी विनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
मंडळातर्फे गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव सोहळ्याचे आयोजन केले जाते, मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव शासनाच्या नियमानुसार साजरा होत आहे. दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. विविध प्रकारचे देखावे दाखवले जातात, मात्र या वर्षी अगदीच साध्या प्रकारे गणेशोत्सव साजरा होत आहे. मंडळाचे कार्यकर्ते गौरव सावंत म्हणाले की, सध्या शासनाच्या नियमानुसार गणेशोत्सव साजरा करत आहोत. पहिल्यांदा विविध कार्यक्रम, देखावे केले जात, मात्र मागच्या वर्षी तसेच या वर्षी कोरोनाचे संकट असल्याकारणामुळे यंदाचा गणेशोत्सव अगदी साध्या प्रकारे साजरा होत आहे.
५) राववाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
सध्या गणेशोत्सवावर कोरोनाचे विघ्न असल्याकारणामुळे गणेशोत्सव सर्व नियम पळून साजरा होत आहे. पूर्वी दर्शनासाठी भाविकांची रांग लागत असे, मात्र सध्या सगळीकडे सामसूम आहे. पूर्वी अनेक उत्सव साजरे केले जात, मात्र या वर्षी अगदीच साधेपणाने गणेशोत्सव साजरा होत आहे.