मोठी बातमी! राम मंदिर उद्घाटननिमित्त २२ जानेवारीला सार्वजनिक सुट्टी; महाराष्ट्र सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 05:54 PM2024-01-19T17:54:56+5:302024-01-19T17:55:11+5:30
२२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे.
मुंबई- २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत देशभरात उत्सुकतेचं वातावरण आहे. प्रत्यक्ष अयोध्येमध्ये राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट, राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारनेही मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येतील राम मंदिर उद्घाटन निमित्त सोमवारी २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२२ जानेवारी दिवशी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. या दिवशी दिवसभर अयोध्येत रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा चालणार आहे. हा सोहळा देशभरात साजरा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. शहरातील मंदिरात ठिकठिकाणी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली
या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी देशभरातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुटी देण्याचे आदेश केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रामध्ये म्हटलंय की, कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत असलेली भावना आणि त्यांच्याकडून करण्यात येत असलेली विनंती विचारात घेऊन सरकारने या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. या दिवशी शाळा महाविद्यालयेही अर्धा दिवसच सुरू राहतील.
आमदारांनी केली होती मागणी
श्री राम मंदिरात सोमवार,दि, २२ जानेवारी रोजी रामलला विराजमान होणार आहेत. सर्वच भारतीयांसाठी हा महत्वाचा आणि अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्या दिवशी सर्वत्र दिवाळी साजरी होणार आहे. या सोहळ्यात नागरिकांना सहभागी होता यावे, त्याचे साक्षीदार होता यावे, यासाठी दि,२२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी भाजप नेते व कांदिवली पूर्व विधानसभेचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच आमदार सत्यजित तांबे यांनीही पत्र देऊन सुट्टीची मागणी केली होती.
Public holiday declared on 22nd January in Maharashtra in view of Ayodhya Ram Temple pranpratishtha pic.twitter.com/Iv9ZxNjJHX
— ANI (@ANI) January 19, 2024