सार्वजनिक बांधकामच्या कारभाराची होणार चौकशी
By admin | Published: June 12, 2015 10:57 PM2015-06-12T22:57:11+5:302015-06-12T22:57:11+5:30
तालुक्यातील देवळी-ठुणावे या रस्त्याचे काम न करताच कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून ३० लाख रु. काढल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जि.प.
वाडा : तालुक्यातील देवळी-ठुणावे या रस्त्याचे काम न करताच कर्मचाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत करून ३० लाख रु. काढल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जि.प. गटनेते निलेश गंधे यांनी आमसभेत केला. एकाच रस्त्यासाठी पुन:पुन्हा बोगस बिले काढली जातात, असा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केला. रस्त्यातील खड्डे न भरताच या खात्याकडून बोगस बिले काढण्यात येतात, असा आरोप मनसेचे उपजिल्हाप्रमुख गोविंद पाटील यांनी केला. या आरोपांची दखल घेता या आरोपांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करा, असे आदेश पालकमंत्री तथा आमसभेचे अध्यक्ष विष्णू सवरा यांनी दिले.
शिरीषपाडा ते अघई या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने पावसाळ्यापूर्वी हे खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी जि.प. सदस्या कीर्ती हावरे यांनी केली असता खड्डे बुजविण्यात येतील, असे आश्वासन उपअभियंता सी.जी. संख्ये यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे माहिती मागितली असता ती दिली जात नाही. तसेच अधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, असा आरोप कांतिलाल देशमुख यांनी केला असता संबंधित अधिकाऱ्यांना समर्पक उत्तर देता आले नाही. वाड्यातील अनधिकृत बांधकाम के व्हा तोडणार, असा प्रश्न मनसेचे देवेंद्र भानुशाली यांनी उपस्थित केला असता १० दिवसांत कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन संख्ये यांनी दिले.
वाडा येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी पाच एकर जागा वनविभागाने द्यावी, अशी मागणी उपसरपंच रोहन पाटील यांनी केली असता तशी तरतूद नसल्याचे वनाधिकारी मार्तंड दळवी यांनी सांगितले. वाडा येथे कृषी विभागाची २४ एकर जागा असून तिच्यावर अतिक्रमण केले जात असल्याने या जागेला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. वरसाळे येथे नवीन आश्रमशाळा सुरू करण्याची मागणी भालचंद्र खोडले यांनी केली. आमसभेला आ. शांताराम मोरे, आ. पांडुरंग बरोरा, वाड्याचे सभापती अरुण गौंड, उपसभापती नंदकुमार पाटील, जि.प. सदस्य व पं.स. सदस्यांसह तहसीलदार संदीप चव्हाण, गटविकास अधिकारी निखिल ओसवाल, आजी-माजी सदस्य, सरपंच, विविध पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)