नारायण जाधव, ठाणेजगातील एकूण १९३ देशांपैकी ११९ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनावर अखेर राज्य मंत्रिमंडळाने आपली मोहर उमटवली आहे़ सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना लाभलेल्या ठाणे जिल्ह्याचे आता ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे झाले आहेत़ यापैकी पालघरमध्ये सागरी आणि डोंगरी प्रदेशाचा समावेश झाला आहे. नागरी तालुके ठाणे जिल्ह्यात राहिले आहेत.मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार नव्याने होणाऱ्या पालघर जिल्ह्यात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा या आठ तालुक्यांचा समावेश राहणार आहे़ यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जिल्हा आता ठाणे जिल्ह्यापेक्षा मोठा राहणार असला तरी त्याच्या वाट्याला २४ पैकी अवघे ६ आमदार व चार खासदारांपैकी एक खासदार येणार आहे़ तर नव्याने अस्तित्वात येणाऱ्या ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर हे सात तालुके येणार असून तब्बल १८ आमदार व तीन खासदार राहणार आहेत़शिवाय, पालघर जिल्ह्यात वसई या एकमेव महापालिकेसह पालघर, जव्हार आणि डहाणू या तीन नगरपालिका राहणार आहेत़ ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भार्इंदर या सहा महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका राहणार आहेत़नेहमीप्रमाणे नव्याने निर्माण होणाऱ्या दोन जिल्ह्यांपैकी शहरी भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व कायम राहणार आहे़ कारण ठाणे जिल्ह्यात १८ आमदारांसह ठाणे, कल्याण आणि भिवंडी या मतदारसंघांतील खासदारांचा समावेश राहणार आहे़ तर पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू या सहा आमदारांसह पालघर लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांचा समावेश असेल. ठाणे जिल्ह्यातील शहरी भागाचे जिल्ह्याचे सरासरी दरडोई उत्पन्न एक लाख पाच हजार ९१४ आहे.
जिल्हा विभाजनामुळे जनतेला न्याय
By admin | Published: June 14, 2014 2:32 AM