विभाजनामुळे जनतेला न्याय

By admin | Published: June 13, 2014 11:06 PM2014-06-13T23:06:26+5:302014-06-13T23:06:26+5:30

जगातील एकूण १९३ देशांपैकी ११९ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनावर अखेर राज्यमंत्री मंडळाने आपली मोहर उमटवली आहे़

Public justice due to divisions | विभाजनामुळे जनतेला न्याय

विभाजनामुळे जनतेला न्याय

Next

नारायण जाधव, ठाणे
जगातील एकूण १९३ देशांपैकी ११९ देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनावर अखेर राज्यमंत्री मंडळाने आपली मोहर उमटवली आहे़ सागरी, डोंगरी व नागरी अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना लाभलेल्या ठाणे जिल्ह्याचे आता ठाणे आणि पालघर असे दोन जिल्हे झाले आहेत़ यापैकी पालघरमध्ये सागरी आणि डोंगरी प्रदेशाचा समावेश झाला आहे. तर नागरी तालुके ठाणे जिल्ह्यात राहिले आहेत.
मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार नव्याने होणाऱ्या पालघर जिल्हयात वसई, पालघर, डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा, वाडा या आठ तालुक्यांचा समावेश राहणार आहे़ यामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने हा जिल्हा आता ठाणे जिल्ह्यापेक्षा मोठा राहणार असला तरी त्याच्या वाट्याला २४ पैकी अवघे ६ आमदार व चार खासदारांपैकी एक खासदार येणार आहे़ तर नव्याने अस्तित्वात येणाऱ्या ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर हे सात तालुके येणार असून तब्बल १८ आमदार व तीन खासदार राहणार आहेत़
शिवाय पालघर जिल्ह्यात वसई या एकमेव महापालिकेसह पालघर, जव्हार आणि डहाणू या तीन नगरपालिका राहणार आहेत़ तर ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, मिरा-भार्इंदर या सहा महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिका राहणार आहेत़
जिल्हा विभाजनाच्या घोषणेमुळे ठाणे जिल्हा परिषदेसह जिल्हा बँकेचेही विभाजन होणार आहेच शिवाय पालक मंत्र्याचेही विभाजन होऊन दोन पालकमंत्री मिळणार आहेत़ मात्र, नेहमी प्रमाणे नव्याने निर्माण होणाऱ्या दोन जिल्ह्यांपैकी शहरी भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या ठाणे जिल्ह्याचे वर्चस्व कायम राहणार आहे़ कारण ठाणे जिल्ह्यात ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ओवळा-माजीवडा,मुंब्रा, मिरा-भार्इंदर, ऐरोली, बेलापूर, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, अंबरनाथ, भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम, भिवंडी ग्रामीण, उल्हासनगर, शहापूर या १८ आमदारांसह ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीन लोकसभा मतदारसंघातील खासदारांचा समावेश राहणार आहे़ तर पालघर जिल्ह्यात वसई, नालासोपारा, बोईसर, पालघर, विक्रमगड, डहाणू या सहा आमदारांसह पालघर लोकसभा मतदारसंघाच्या खासदाराचा समावेश राहणार आहे़
शहरी भागाचे वर्चस्व असलेल्या ठाणे जिल्ह्यात वागळे इस्टेट, ठाणे-बेलापूर, डोंबिवली, शहाड, अंबरनाथ, आटगांव, आसनगांव, मुरबाड या औद्योगिक वसाहतींसह आशिया खंडातील सर्वात मोठी समजली जाणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह देशातील आघाडीच्या रिलायन्स उद्योग समूहाच्या मुकेश आणि अनिल अंबानी यांची मुख्यालये, महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्क, बेलापूरचा टेक्नॉलॉजी पार्क,
वाशीतील इन्फोटेक पार्कसह भिवंडीतील पॉवरलूम उद्योगाचा समावेश आहे़ यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थासह नागरीकरण आणि औद्योगिक करणामुळे जिल्ह्याचे सरासरी दरडोई उत्पन्न एक लाख पाच हजार ९१४ आहे. तर आदिवासी भागात अत्यंत कमी म्हणजे जिल्हा उत्पन्नाच्या फक्त २.७४ टक्के वाटा प्राथमिक क्षेत्रातून (शेतीशी निगडीत) येत आहे. म्हणजेच ग्रामीण भागाचे दरडोई उत्पन्न अत्यल्प कमी असून ते गडचिरोली जिल्ह्यापेक्षा कमी आहे़

Web Title: Public justice due to divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.