'निर्भय बनो'ची १७ मे रोजी कांदिवलीत जाहीर सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 05:18 PM2024-05-15T17:18:35+5:302024-05-15T17:19:28+5:30
'भारत जोडो अभियाना'चा एक भाग म्हणून निवडणुकीच्या तोंडावर 'निर्भय बनो' अभियान राबविले जात आहे.
मुंबई - घटनात्मक मूल्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि मतदारांनी सजग आणि निर्भयपणे मतदान करावे यासाठी 'निर्भय बनो' अभियानाअंतर्गत १७ मे रोजी कांदिवली येथे जाहीर सभेचे आयोजन कऱण्यात आले आहे. सभेमध्ये ज्येष्ठ वकील असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत.
'भारत जोडो अभियाना'चा एक भाग म्हणून निवडणुकीच्या तोंडावर 'निर्भय बनो' अभियान राबविले जात आहे. हा सामाजिक संस्था, संघटनांचा मंच आहे. या शिवाय सभेत भारतीय दलित पॅन्थर, कष्टकरी शेतकरी संघटना, गुजरातमधील संत रोहिदास वाडियार चर्मकार समाजही सहभागी होणार आहे.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, घटनात्मक मूल्यांना अनुसरून मतदान करावे आणि लोकशाहीच्या उत्सवात आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे ही आपल्या देशाची गरज आहे. असे आवाहन करण्यासाठी आम्ही भारत जोडो अभियान आणि निर्भय बनो मिळून एका जाहीर सभेचे आयोजन करीत आहोत, असे भारत जोडोचे मुंबई सहसमन्वयक सिताराम शेलार यांनी सांगितले.
शु्क्रवारी, १७ मे रोजी संध्याकाळी ७ वाजता कांदिवलीच्या सह्याद्री नगर मैदानात ही सभा होईल. घटनेच्या प्रस्ताविकेचे जाहीर वाचन करून सभेची सुरुवात होईल. सामाजिक क्षेत्रातील मान्यवर वक्ते मार्गदर्शन करतील आणि राष्ट्रगीताने समारोप होईल.