Join us

‘लाव रे तो व्हिडीओ’, राज ठाकरेंच्या दुसऱ्या टप्प्यातील जाहीर सभा  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 5:58 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभरात 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या आश्वासनांची पोलखोल करणाऱ्या सभांचा धडाका लावला आहे. राज्यातील लोकसभा निडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुन्हा सभा घेणार आहेत.

दुसऱ्या टप्प्यातील राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये राज ठाकरे सगल चार दिवस सभा घेणार आहेत. 23 एप्रिल रोजी मुंबईतील काळाचौकी परिसरात असलेल्या शहीद भगतसिंग मैदानात त्यांची पहिली सभा होणार आहे. त्यानंतर 24 एप्रिलला भांडुपमध्ये, 25 एप्रिलला कामोठे, पनवेल आणि 26 एप्रिलला नाशिकमधील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानात राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. 

 

राज ठाकरे यांनी आतापर्यंत राज्यात नांदेड, सोलापूर, इचलकरंजी, सातारा, पुणे आणि महाड येथे सभा घेतल्या आहेत. या सभांमधून राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना लक्ष केले आहे. व्हिडीओच्या माध्यमातून नरेंद्र मोदी आणि भाजपाने दिलेल्या आश्वासनांची पोलखोल केली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या टप्प्यातील सभांमध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे कोणता व्हिडीओ दाखवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईत 24 तारखेला राज ठाकरे यांच्या सभेसाठी परवानगी मिळावी, यासाठी मनसेकडून प्रयत्न सुरु होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेदवारांना विविध परवानग्यांसाठी 'एक खिडकी योजनें'तर्गत अर्ज करणे आवश्यक असते. त्यानुसार मनसेचा अर्ज दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील एक खिडकी योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी पाठविण्यात आला होता. मात्र, त्यांनी मनसे निवडणूक लढवत नसल्याचे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती. परंतु आता राज ठाकरे यांच्या सभेला 24 तारखेऐवजी 23 तारखेला परवानगी देण्यात आली आहे. 

टॅग्स :राज ठाकरेमनसेलोकसभा निवडणूकमुंबईभाजपा