प्रदूषणाविरोधात जनआंदोलन, प्रतीक्षा नगर, कोळीवाड्यातील नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 01:53 AM2019-03-08T01:53:42+5:302019-03-08T01:53:50+5:30
सत्ताधारी पक्ष व महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे प्रतीक्षानगर आणि शीव कोळीवाडा विभागातील वातावरण दिवसागणिक प्रदूषित होत आहे.
मुंबई : सत्ताधारी पक्ष व महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे प्रतीक्षानगर आणि शीव कोळीवाडा विभागातील वातावरण दिवसागणिक प्रदूषित होत आहे. येथील प्रदूषण कमी करण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासन काहीच उपाय योजना करत नाही. परिणामी या निषेधार्थ काँग्रेसतर्फे गुरुवारी इमारत क्रमांक टी-१९ प्रतीक्षानगर, शीव कोळीवाडा ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कार्यालय, शीव सर्कल येथे जनआंदोलन पुकारण्यात आले होते.
सायन कोळीवाडा व प्रतीक्षा नगरमध्ये गेल्या वर्षभरापासून रस्त्याचे, सांडपाणी वाहून नेत असलेल्या वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. कामादरम्यान येथील धूळीकण वातावरणात पसरू नयेत म्हणून काहीच उपाय योजना करण्यात आल्या नाहीत. परिणामी परिसरावर प्रदूषणाची चादर पसरली असून, नागरिकांना याचा अतोनात त्रास होतो आहे.
धुळीकणाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांना श्वास घेताना त्रास होत असून, आजाराचे प्रमाण वाढल्याने घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. परिणामी याबाबत ठोस उपाय योजना करण्यासाठी काँग्रेसतर्फे जनआंदोलन उभारण्यात आले होते. महिलांसह तरुणांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रदूषण मंडळाला निवेदन देत कार्यवाहीची मागणी केली. यावर मंडळाने योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.