महत्त्वाचे साक्षीदार न्यायालयात हजर करण्यास सरकारी वकील अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 03:00 AM2018-01-07T03:00:54+5:302018-01-07T03:01:05+5:30
वरिष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनवर खटला सुरू आहे, परंतु या हत्येचा हेतू आणि हल्लेखोरांची ओळख पटविणे, हे सरकारी वकिलांसमोर मोठे आव्हान आहे. कारण सरकारी वकिलांच्या दाव्याचे समर्थन करणाºया महत्त्वाच्या साक्षीदारांनी विशेष न्यायालयात साक्ष देण्यास उपस्थित राहण्यास नकार दिला.
मुंबई : वरिष्ठ पत्रकार जे. डे हत्येप्रकरणी छोटा राजनवर खटला सुरू आहे, परंतु या हत्येचा हेतू आणि हल्लेखोरांची ओळख पटविणे, हे सरकारी वकिलांसमोर मोठे आव्हान आहे. कारण सरकारी वकिलांच्या दाव्याचे समर्थन करणाºया महत्त्वाच्या साक्षीदारांनी विशेष न्यायालयात साक्ष देण्यास उपस्थित राहण्यास नकार दिला.
जे. डे यांची हत्या त्यांच्या राहत्या घराजवळच झाली. ते राहत असलेल्या इमारतीचा वॉचमन हा या घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. ओळख परेडच्या वेळी वॉचमनने हल्लेखोरांना ओळखलेदेखील होते. त्या लोकांनी त्याला धमकावल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले होते. या खटल्यात वॉचमन महत्त्वाचा साक्षीदार असल्याने, त्याला पोलीस संरक्षणही पुरविण्यात आले होते. मात्र, भीतीमुळे त्याने न्यायालयात येण्यास नकार दिला. त्यामुळे सरकारी वकिलांना इमारतीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजवर व हल्लेखोरांच्या कॉल डाटा रेकॉर्डवर अवलंबून राहावे लागणार आहे.
सीसीटीव्ही फुटजेही स्पष्ट नसल्याने, सीबीआयने एका अमेरिकन तज्ज्ञाच्या मदतीने बाइक नंबर मिळविला. त्याचीही साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, जे. डे यांनी छोटा राजनविरोधात अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केल्याने छोटा राजन त्यांच्यावर नाराज होता, तसेच जे. डे एक पुस्तकही प्रकाशित करणार होते. या पुस्तकात त्यांनी छोटा राजनचा उल्लेख छोटा गँगस्टर असा केल्याने राजन अतिशय संतापला होता. त्यामुळे त्याने जे. डे यांना मारण्याचा कट रचला. खुद्द छोटा राजननेही काही प्रसारमाध्यमांसमोर ही बाब मान्य केली आहे. हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी राजनच्या आवाजाचा नमुनाही घेतला. हा नमुना प्रसारमाध्यमांकडे असलेल्या टेपशी जुळविला असता, तो आवाज राजनचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र, हे सिद्ध करण्यासाठी सरकारी वकिलांना मोठा अडथळा पार करावा लागणार आहे. कारण जे. डे यांचे छोटा राजनवरील पुस्तक प्रकाशित करणारा प्रकाशकही सरकारी वकील न्यायालयात साक्ष देण्यासाठी उपस्थित करू शकले नाहीत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, या प्रकाशकाला त्याच्या माजी सहकाºयाची हत्या करण्याचा कट रचल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. त्याशिवाय, राजनच्या आवाजाचा नमुना प्रसारमाध्यमांकडे असलेल्या मुलाखतीच्या टेपमधील आवाजात साम्य आहे, असा अहवाल देणारे राजेंद्र सिंग यांचीही साक्ष न्यायालयात नोंदविता आली नाही.
हजर राहण्यास नकार
राजेंद्र सिंग यांची साक्ष नोंदविण्यासाठी त्यांना न्यायालयाचा साक्षीदार म्हणून बोलाविण्यात यावे, यासाठी बचावपक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला विनंती केली. न्यायालयाने त्यांना समन्सही बजावले. मात्र, सिंग यांनी साक्ष देण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यास नकार दिला. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
आरोप सिद्ध करणे
हे आव्हान
सरकारी वकिलांनी साक्षी-पुरावे नोंदविण्याचे काम पूर्ण केले आहे. सरकारी वकिलांतर्फे आणखी साक्षीदार आणण्यात येणार नाहीत. त्यामुळे सरकारी वकिलांना छोटा राजनवरील आरोप सिद्ध करणे, हे मोठे आव्हान आहे.