बनावट कागदपत्रांद्वारे झाला सरकारी वकील, ॲड. शेखर जगतापविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:26 PM2024-03-05T14:26:27+5:302024-03-05T14:26:46+5:30
बनावट कागदपत्रांद्वारे झाला सरकारी वकील, ॲड. शेखर जगतापविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई : विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती नसतानाही काही महत्त्वाच्या खटल्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडून न्यायालय आणि सरकारची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वकील शेखर जगताप याच्यासह श्याम सुंदर अग्रवाल, शरद अग्रवाल, किशोर भालेराव तसेच अन्य साथीदारांविरुद्ध कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. जगतापने गृह विभागाचे तत्कालीन उपसचिव किशोर भालेराव यांच्याशी संगनमत करून विशेष सरकारी अभियोक्ता असल्याची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रे बार कौन्सिल येथे सादर केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
व्यावसायिक संजय पुनामियाच्या तक्रारीत म्हटले आहे की, जगताप याने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर पोलिस अधिकारी आणि बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या खंडणी आणि फसवणुकीच्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये सरकारी पक्षाची बाजू मांडली होती. जगतापने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या सुनावणीदरम्यान आरोपींना गुन्ह्यातून दोषमुक्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. छोटा शकील, श्यामसुंदर अग्रवालसह अन्य आरोपींची सुटका होण्यासाठी जगताप काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजय पुनामियाच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाशी संबंध आल्यानंतर किशोर भालेराव यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त
डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
आरोपात तथ्य
नाही - जगताप
याप्रकरणी जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, हा गुन्हा रद्द करण्यासाठी मी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. याप्रकरणाती माझी नियुक्ती नियमाप्रमाणे पोलिसांकडून मुलाखत घेऊन करण्यात आली होती. माझ्या नियुक्तीचे पत्र गृह विभागाकडून संबंंधीत गुन्ह्यांमध्ये तपास यंत्रणांनाही मिळाले होते. त्यामुळे या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी म्हटले.