लोकप्रतिनिधी-प्रशासन आमने-सामने

By Admin | Published: October 20, 2015 02:10 AM2015-10-20T02:10:36+5:302015-10-20T02:10:36+5:30

कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील राजकीय गोल्डन गँग आणि पालिकेतील दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता.

Public Representative-administration face-to-face | लोकप्रतिनिधी-प्रशासन आमने-सामने

लोकप्रतिनिधी-प्रशासन आमने-सामने

googlenewsNext

ठाणे : कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील राजकीय गोल्डन गँग आणि पालिकेतील दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर, याचे पडसाद आता ठाणे महापालिकेत उमटू लागले आहेत. काही राजकीय नेत्यांनी नाहक लोकप्रतिनिधींची बदनामी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. परंतु, आजही त्यांचे काही प्रकल्प हे अनियमिततेच्या घेऱ्यात असल्याचा दावा काहींनी केल्याने त्यावर पुन्हा मंगळवारी होणाऱ्या महासभेत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, या महासभेला गोल्डन गँगचे तथाकथित ते सहा जण उपस्थित राहून चर्चा घडविणार का, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
परमार यांनी ७ आॅक्टोबर रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर, आता पोलिसांनी आपली तपासचक्रे फिरविण्यास सुरुवात केली. परंतु, यामध्ये पालिकेतील राजकीय गोल्डन गँगचा उल्लेख करून सहा जणांची नावे लिहिली होती. परंतु, ती खोडल्याने ते सहा जण कोण, असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
विशेष म्हणजे ही चर्चा सुरू झाल्यानंतर काही राजकीय पुढाऱ्यांनी पुढे येऊन अशा प्रकारे नाहक लोकप्रतिनिधींची प्रतिमा या निमित्ताने मलीन होत आहे. परमार यांच्या प्रकल्पांमध्ये आजही अनियमितता असल्याचा दावा काहींनी केला आहे. परंतु, प्रशासनाने मात्र त्या अनियमितता दूर झाल्याचे सांगून त्यांना परवानगी दिल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता याच मुद्यावरून मंगळवारी होणाऱ्या महासभेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमने-सामने भिडणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे सोमवारी झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत परमार यांच्या मुद्यावर चर्चा झाली नसली तरी काही लोकप्रतिनिधी हे घाबरले असल्याचे राजकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)

पोलीस तपासणार प्रस्तावांतील सर्व बाबी
कॉसमॉस ग्रुपचे मालक सुरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये महापालिकेतील राजकीय गोल्डन गँग आणि पालिकेतील दोन अधिकाऱ्यांचा उल्लेख केला होता. परंतु, त्यांच्या काही प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शनिवारी पोलिसांनी अतिरिक्त आयुक्तांकडून कॉसमॉस ग्रुपचे सर्व प्रस्ताव तपासण्यासाठी घेतले असून त्यामध्ये अनियमितता होती का? पालिकेने कोणत्या नियमांनुसार परवानगी दिली, यासह इतर सर्वच बाबींचा तपास सुरू केला आहे.
त्या सुसाइड नोटचा तपासणी अहवाल १० दिवस उलटल्यानंतरही अद्याप फॉरेन्सिक लॅबमधून आलेला नाही. मात्र, अधिकारी आणि पालिकेतील राजकीय गोल्डन गँगची नावे चर्चेत आल्याने शनिवारी ठाणे पोलिसांनी ठामपाच्या अधिकाऱ्यांपासून चौकशीला सुरुवात केली आहे. त्यानुसार, चार तास अतिरिक्त आयुक्तांकडे चौकशी केल्यानंतर परमार यांच्या प्रत्येक प्रकल्पाच्या प्रस्तावाच्या प्रती पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. त्यानंतर, त्यांच्या छाननीचे काम सुरू केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. परमार यांच्या काही प्रकल्पांमध्ये अनियमितता असल्याच्या मुद्यावरून स्थायी आणि महासभेत वारंवार चर्चा झाली होती. त्यानुसार, पोलिसांनी स्थायी आणि महासभेचे इतिवृत्तान्तही यापूर्वीच ताब्यात घेतले आहेत. याचाच आधार घेऊन आता त्यांच्या प्रकल्पांच्या प्रस्तावांची चौकशी सुरू केली आहे. या प्रस्तावांना नियमानुसार परवानगी दिली होती का, कोणत्या कायद्याचा आधार घेऊन त्यांना परवानगी दिली गेली, खरंच अनियमितता होती का, असल्यास ती कोणत्या आधारे दूर केली, असे प्रत्येक बारकावे तपासण्यासाठी पोलिसांची टीम ही छाननी करीत आहे. तसेच ज्या प्रस्तावांमध्ये अनियमितता होती, त्याच प्रस्तावांच्या मुद्यावरून स्थायी आणि महासभेत चर्चा झाली होती का, याची पडताळणीदेखील ते करीत आहेत.

Web Title: Public Representative-administration face-to-face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.