Join us

सार्वजनिक शौचालये पालिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:44 AM

प्रश्न ७० हजार स्वच्छतागृहांचा : म्हाडासमोर ठेवली दुरुस्तीची अट

मुंबई : शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या ७० हजार शौचालयांचा (शौचकूप) प्रश्न लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. मात्र, यापैकी धोकादायक असलेल्या शौचालयांचे स्ट्रक्चरल आॅडिट करून त्याची दुरुस्ती म्हाडा प्रशासनाने करावी, अशी अट महापालिकेने घातली आहे. त्यानंतरच या शौचालयांची जबाबदारी महापालिका घेणार आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत ही शौचालये ताब्यात घेऊन, त्याची देखभाल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबई हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे. मात्र, त्यात तुलनेत मुंबईतील सार्वजनिक शौचालयांची संख्या कमी आहे. म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मुंबईत ८८ हजार शौचालये (शौचकूप) बांधण्यात आली आहेत. यापैकी जी-दक्षिण आणि एफ-दक्षिण येथील तीन हजार शौचकूप पालिकेने ताब्यात घेतली. मात्र, ७० हजार शौचालये ताब्यात घेण्यास पालिकेने नकार दर्शविला होता. म्हाडाही त्यांची दुरुस्ती करीत नसल्यामुळे या शौचालयांची दुरवस्था झाली आहे, तर धोकादायक शौचालयांना पालिकेकडून पाणी व वीजपुरवठा होत नव्हता. त्यामुळे यापैकी काही शौचालयांचा वापरही होत नव्हता.

याबाबत गेल्या वर्षी नगरविकास सचिवांकडे झालेल्या बैठकीत ही शौचालये पालिकेने महिन्याभरात ताब्यात घ्यावीत, असे आदेश देण्यात आले. ९,५४० शौचालये म्हाडाने दुरुस्त करण्याचे ठरले, तसेच केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ योजनेतील मार्गदर्शक तत्त्वानुसार म्हाडाने पाच वर्षांच्या दुरुस्तीच्या करारासह यापुढे शौचालये बांधावी, असेही या बैठकीत ठरले. मुंबईत २२ हजार शौचालये बांधण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. मात्र, जागेअभावी या शौचालयांचे काम रखडले आहे. याबाबत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले असताना म्हाडाने शौचालयाची दुरुस्ती केल्यावरच त्यांच्या शौचालयांची जबाबदारी घेण्याची तयारी उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी स्थायी समितीत सांगितले.

८० हजार शौचकुपे धोकादायक१९८० पासून बांधलेल्या शौचालयांपैकी सुमारे ८० हजार शौचकुपे धोकादायक आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, एक शौचकूप ५० व्यक्ती वापरतात. स्वच्छ भारत अभियानांतर्गत एक शौचकूप ३५ व्यक्ती वापर करतात. मात्र, सध्या २०० व्यक्तींकडून एका शौचकुपाचा वापर केला जातो. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका