सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:10 AM2021-02-20T04:10:52+5:302021-02-20T04:10:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त आवाज फाउंडेशन संस्थेच्यावतीने ‘हाँकिंग आणि ...

The public transport system needs to be improved | सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारायला हवी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या रस्ता सुरक्षा महिन्यानिमित्त आवाज फाउंडेशन संस्थेच्यावतीने ‘हाँकिंग आणि रोड सेफ्टी’ या विषयावर वेबिनार आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात कमला रहेजा इन्स्टिट्यूटचे हुसेन इंदोरवाला, जसलोक रुग्णालयाचे संचालक डॉ अल्ताफ पटेल आणि वाहतूक विभागाचे माजी पोलीस उपायुक्त हरीश बैजल सहभागी झाले होते. भारतात दर पाच मिनिटात रस्त्यावर एक अपघात होतो. पुढील काही महिन्यांमध्ये भारतात दररोज ४० किलोमीटर नवीन रस्ते तयार करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतही कोस्टल रोड व सी लिंक असे मोठे प्रकल्प बनत आहेत. त्यामुळे मुंबईतही रस्ते अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेता या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी हुसेन इंदोरवाला म्हणाले की, १९९८ साली मुंबईत सार्वजनिक वाहतुकीचा वापर ७० ते ८० टक्के होता. हाच दर २००८ साली ७२ टक्के झाला व २०१९ साली ५६ टक्के झाला. चारचाकी आणि दुचाकींचा वाढलेला वापर याला मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. १९९८ साली मुंबईत अडीच लाख चारचाकी होत्या. तीच संख्या २०१८ साली दहा लाखांवर गेली आहे. चारचाकी गाड्या रस्त्यावर जास्त जागा व्यापून कमी प्रवाशांची ने-आण करतात. यामुळे प्रशासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे बससाठी एका विशेष लेनची व्यवस्था करण्याचीदेखील गरज असल्याचे ते म्हणाले.

डॉ अल्ताफ पटेल म्हणाले की, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते दिवसातून ८ तास ८५ डेसिबलचा आवाज ऐकणे अतिशय हानिकारक आहे. अमेरिकेतील एका संशोधनाच्या मते ध्वनिप्रदूषणामुळे ६ ते १९ वयोगटातील मुलांची ऐकण्याची क्षमता कमी झाली. गाड्यांच्या दररोज वाजणाऱ्या हॉर्नमुळे माणसाच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे. यासाठी हॉर्नमुक्त ड्रायव्हिंगचे धडे देणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच हरीश बैजल म्हणाले की, अनेक देशात विनाहॉर्न वाजवितादेखील वाहतूक सुरळीत चालत आहे. मात्र भारतात वाहनचालकांना हॉर्न न वाजविता गाडी चालविणे शिकविले गेले नसल्याने हॉर्नचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडते.

Web Title: The public transport system needs to be improved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.