‘भाजप’ला जनताच धडा शिकवेल
By admin | Published: February 4, 2017 08:54 PM2017-02-04T20:54:39+5:302017-02-04T20:54:39+5:30
नीलेश राणे : केंद्र, राज्य शासन जनतेला अभिप्रेत काम करण्यात अपयशी
कणकवली : केंद्र आणि राज्यातले भाजप शासन जनतेला अभिप्रेत अशी विकासकामे करण्यात अपयशी ठरले आहे. नोटाबंदीमुळे ग्रामीण भागाचे फार मोठे नुकसान झाले आहे. बेरोजगारी वाढली असून, शेती मालाचे दर गडगडले आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफीही दिलेली नाही. त्यामुळे जनता भाजप शासनाला धडा शिकवेल, असे सांगतानाच या निवडणुकीत सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस एकतर्फी यश मिळविल, असा विश्वास माजी खासदार नीलेश राणे यांनी येथे व्यक्त केला.
येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी आमदार नीतेश राणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत घेऊन एकसंधपणे लढणार आहे. आजवर आम्ही जनतेला पारदर्शक कारभार दिला. तसाच कारभार यापुढेही आम्ही देणार आहोत. माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीतही विरोधकांना आम्ही निश्चितपणे चितपट करणार आहोत. तसेच नगरपालिकांप्रमाणेच जिल्हा परिषद निवडणुकांतही काँग्रेस अग्रस्थानी राहील, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप आणि शिवसेनेला काँग्रेस विरोधात लढायचे असेल तर युती केल्याखेरीज पर्याय राहिलेला नाही. सध्या शिवसेना-भाजप स्वतंत्र लढत असले तरी त्यांना छुपी युती करूनच काँग्रेससमोर यावे लागेल, असे नीलेश राणे म्हणाले.(प्रतिनिधी)
बंडखोरी होणार नाही : दत्ता सामंत
यावेळी दत्ता सामंत म्हणाले, काँग्रेसमधून निवडणूक लढविण्यासाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज आले. मात्र, सर्वच उमेदवारांनी नारायण राणे जो निर्णय देतील तो मान्य असेल, असे आधीच सांगितले होते. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कुठल्याच मतदारसंघात काँग्रेसमध्ये बंडखोरी होणार नाही.
ं‘भाजप’ला सत्तेपासून दूर ठेवण्याची वेळ
यावेळी नीलेश राणे म्हणाले, देशातील भाजप शासनाने देशाला संकटात टाकले आहे. नोटाबंदीमुळे हजारोंना रोजगार संधी गमवावी लागली आहे. सर्वच प्रकल्प ठप्प झाले आहेत. राज्य शासनदेखील विकासाचा गाडा हाकण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपला आता सर्वच सत्तास्थानांपासून दूर ठेवण्याची वेळ आली आहे.