Join us

वर्सोवा बीचवरील संरक्षक भिंतीने जुहू-मोरा गावच्या  किनाऱ्याची होते धूप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 8:03 PM

वर्सोवा बीच वर बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचा मोठा फटका आता जुहूच्या मोरागाव कोळीवाड्याला बसत असून येथील मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई- सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) मुंबईच्या वर्सोवा बीच येथे 12 फूट उंचीवर संरक्षक भिंत बांधली आहे. समुद्र किनारी होणाऱ्या धूपेमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सिमेंटचे  टेट्रापॉड टाकण्याची त्यांची योजना आहे, कारण दरवर्षी या भागात उंचावलेल्या भागात पूरस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे वर्सोवा बीचवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम जवळजवळ संपत आले आहे.वेसावा शेवटच्या बस स्टॉप समोरील देवाची वाडी ते सातबंगला सागरकुटीर समुद्रकिनारी असलेल्या झोपडपट्टीपर्यंत  संरक्षक भिंत टाकण्यात येत आहे.

वर्सोवा बीच वर बांधण्यात येणाऱ्या संरक्षक भिंतीचा मोठा फटका आता जुहूच्या मोरागाव कोळीवाड्याला बसत असून येथील मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. तसेच येथील समुद्रकिनार्‍याला पर्यावरणाचे तीव्र नुकसान होत असून येथील समुद्र किनाऱ्याच्या धूपामुळे मोरागाव येथील समुद्रकिनार्‍यावर त्याचा तीव्र परिणाम झाला आहे. जर हा प्रकार कायम राहिला तर येथील समुद्रकिनाराच नष्ट होऊ शकतो.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष घालावे असा इमेल वॉचडॉग फाऊंडेशनचे संचालकअ‍ॅड. गॉडफ्रे पिमेटा व निकोलस अल्मेडा यांनी केला आहे.

वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून वांद्रे ते वरळी हे अंतर वाहनाने केवळ 4 ते 5 मिनिटांत जरी पार करता येत असले तरी,शिवाजी पार्कच्या समुद्र किनाऱ्याची धूप झाली  अशी माहिती त्यांनी लोकमतला दिली. डॉ. माधव चितळे समितीच्या शिफारशींकडे संबंधीत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला असून अधिक उशीर होण्यापूर्वीच याप्रकरणी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

जेव्हापासून वर्सोवा किनारपट्टीवर संरक्षक भिंत बांधण्यास सुरवात केेेल्यापासून त्याचा मोठा फटका जुहू मोरागाव किनारपट्टीला बसला आहे.येथे वेगाने धडकत असलेल्या लाटांनी समुद्रकिनाऱ्याची धूप मोठ्या प्रमाणात होत आहे.येथे सुमारे 40 छोट्या व मोठ्या मच्छिमार बोटी असून किनाऱ्याची धूप झाल्याने आज येथील मच्छिमारांना बोटी शाकारण्यासाठी (नांगरण्यासाठी)जागाच शिल्लक राहिली नाही.वेळीच शासनाने याकडे जातीने लक्ष द्यावे.

राजेश मांगेला, महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सदस्य

टॅग्स :महाराष्ट्रमुंबईसागरी महामार्ग