सार्वजनिक बांधकाम विभागाचा क्लास वन अधिकारी एसीबीच्या जाळयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:07 AM2021-03-26T04:07:33+5:302021-03-26T04:07:33+5:30
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंधेरी कार्यालयातील क्लास वन अधिकारी वीरेंद्र कुमार सिन्हा आणि भंडारपाल प्रकाश परब (वय ४५) ...
मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंधेरी कार्यालयातील क्लास वन अधिकारी वीरेंद्र कुमार सिन्हा आणि भंडारपाल प्रकाश परब (वय ४५) हे
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. यात सव्वा चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना परबला रंगेहात पकडण्यात आले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ‘स्वच्छ भारत-स्वच्छ मुंबई’ यासाठी काम करतात. स्वच्छतेबाबत जनजागृतीबरोबर विविध ठिकाणी निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे ओला कचरा व सुका कचरा असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे काम करतात. ऑगस्ट २०१८ पासून त्यांनी वांद्रे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गव्हर्न्मेंट कॉलनी येथे प्रायोगिक तत्त्वावर काम चालू केले.
अशात केलेल्या कामांपैकी एकाच बिलाची रक्कम मिळाली, उर्वरित २१ लाख ९३ हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी प्रकाश परब याने बिलाच्या ४५ टक्के रकमेची मागणी केली. मात्र, पैसे द्यायचे नसल्यामुळे त्यांनी जानेवारीमध्ये एसीबी कार्यालय गाठून तक्रार दिली. यात एक फेब्रुवारी रोजी
एसीबीने केलेल्या पडताळणीत परब यांनी ९ लाख ८६ हजार रुपये मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अशात २४ मार्च रोजी केलेल्या सापळा कारवाईदरम्यान सिन्हा यांनी त्यांच्या हिश्श्याची लाचेची रक्कमही त्याच्याकडे देण्यास सांगून गुन्ह्याला प्रोत्साहन दिले. अशात परबला सव्वा चार लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीचा अधिक तपास सुरू आहे.