Join us

भागवत राय यांच्या पहलवान साहेब जीवन चरित्राचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सर्कसपटू मल्ल भागवत राय यांच्या पहलवान साहेब या जीवन चरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्कसपटू मल्ल भागवत राय यांच्या पहलवान साहेब या जीवन चरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा या शासकीय निवासस्थानी करण्यात आले. भागवत राय यांचे नातू आणि मुंबई क्षेत्रीय पारपत्र अधिकारी मनोज कुमार राय यांनी हे जीवन चरित्र लिहिले आहे. भागवत राय यांचे हे जीवन चरित्र बारा प्रकरणात विभागले आहे. यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे विविध पैलू उलगडून दाखवण्यात आले आहेत.

भागवत राय ताकदीचे प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध होते. स्वातंत्र्यपूर्व काळात राय यांनी १९२५ मध्ये सर्कस कंपनी स्थापन केली. सर्कशीतून भागवत राय हत्तीला छातीवर उभे करून लोकांशी संवाद साधणे, धावती मोटारकार रोखणे, सुमारे तीन क्विंटल दगडाचा भार छातीवर तोलून धरणे असे ताकदीचे प्रयोग योग आणि प्राणायाम यांच्याद्वारे लीलया करून दाखवत. दरम्यान, प्रकाशन प्रसंगी मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पुस्तकाचे लेखक मनोज कुमार राय, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मुंबई क्षेत्रीय पारपत्र कार्यालयातील अधिकारी जयंत कुमार सावो, जॉन मार्क, संगीता राय, लेखक प्रणव वत्स उपस्थित होते.

---------------

सर्कसपटू मल्ल भागवत राय यांच्या पहलवान साहेब या जीवन चरित्रातून वाचकांना प्रेरणा मिळेल. चांगले काम करण्याची ऊर्जा मिळेल. पुस्तकातून सकारात्मक विचारप्रणाली जागृत होईल.

- मनोज कुमार राय

---------------