Join us

गणेशोत्सव माहिती पुस्तिकेचे प्रकाशन....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:11 AM

मुंबई : गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांच्या मार्गदर्शनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी विशेष पुस्तिका ...

मुंबई : गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांच्या मार्गदर्शनासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात येते. या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही पुस्तिका येत्या सोमवारपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यंदाच्या गणेशोत्सव माहिती पुस्तिकेत सर्वसाधारण माहिती, मंडप परवानगी अर्जाचा नमुना, सर्वसमावेशक सुधारित मार्गदर्शक सूचना येत आहेत. तसेच राज्य शासनाची गणेशोत्सव २०२१ संदर्भातील परिपत्रक, गणेशोत्सवात जाहिराती प्रदर्शित करण्याबाबतचे निकष, महापालिकेचे व इतर महत्त्वाचे नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, विभागीय नियंत्रण कक्षांचे संपर्क क्रमांक, नैसर्गिक विसर्जन स्थळांचा विभागवार नकाशा, कृत्रिम विसर्जन तलावांची विभागवार यादी, सण आणि समारंभांसाठी रस्त्यांवर तात्पुरते बांधकाम उभारण्यास परवानगी देण्याबाबतच्या धोरणातील महत्त्वाच्या तरतुदी, मूर्ती विसर्जनच्या दिवशी समुद्राला असलेल्या भरती व ओहोटीच्या वेळा, लाटांची उंची इत्यादी माहितीचा समावेश या पुस्तिकेत आहे.

ही पुस्तिका महापालिकेचे संकेतस्थळ www.mcgm.gov.in किंवा http://portal.mcgm.gov.in यावरही उपलब्ध करुन देण्यात येत आहे.