मुंबई : नवरात्रौत्सवाच्या प्रारंभी रविवारी ‘लोकमत कालदर्शिका २०२०’चा प्रकाशन सोहळा मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात दिमाखात करण्यात आला. महालक्ष्मी मातेच्या साक्षीने प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले, ‘श्लोक’च्या संस्थापिका शीतल दर्डा, त्यांची कन्या शनाया दर्डा आणि महालक्ष्मी मंदिराचे महाव्यवस्थापक शरदचंद्र विनायक पाध्ये यांच्या हस्ते ‘लोकमत कालदर्शिका २०२०’चे प्रकाशन करण्यात आले. लाखोंचा खप असलेल्या लोकमत कालदर्शिकेने गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राच्या घराघरातील भिंतीवर मानाचे स्थान मिळविले आहे. यंदाही विविध क्षेत्रांतील दिग्गज लेखक आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांची मेजवानी कालदर्शिकेतून मिळणार आहे.या प्रकाशन सोहळ्याला ‘लोकमत’चे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर आणि लोकमत कालदर्शिकेचे प्रमुख व्यवस्थापक विजय झिमुर आदी मान्यवर उपस्थित होते. फक्त मराठीच नव्हे तर भारतीय माणसाच्या सांस्कृतिक जीवनावर कालदर्शिकेने सांस्कृतिक ठसा उमटवला आहे. कालदर्शिकेतून फक्त पंचांग आणि दिनदर्शिका प्रकाशित केलेली नाही तर लोकांच्या गरजा लक्षात घेऊन अनेक उपयुक्त विषयही मांडले आहेत. दैनंदिन जीवनातील गरजा डोळ्यांसमोर ठेवून कालदर्शिकेत खाद्य, आरोग्य, धार्मिक, कला अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे.या वर्षी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, डॉ. प्रकाश आमटे, प्रल्हाद पै, श्री श्री रविशंकर, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मुक्ता बर्वे, शेफ विष्णू मनोहर, गौर गोपाल दास, रेखा दिवेकर, डॉ. सुभाष पवार, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे आणि ‘राशीचक्र’कार शरद उपाध्ये इत्यादी मान्यवरांचे कुटुंबासाठी उपयुक्त लेख कालदर्शिकेत प्रकाशित करण्यात आले आहेत. तसेच, राशीभविष्य, तिथी, नक्षत्र, सण-उत्सव यांची अचूक माहिती यात समाविष्ट करण्यात आली आहे. त्यामुळे ही दिनदर्शिका कुटुंबातील प्रत्येकासाठी मार्गदर्शिका ठरली आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर दिमाखात ‘लोकमत कालदर्शिके’चे प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:46 AM