मुंबई विद्यापीठाच्या संभाषण नियतकालिकातर्फे कोरोना साथीवरील पुस्तकाचे प्रकाशन

By सीमा महांगडे | Published: October 3, 2022 04:50 PM2022-10-03T16:50:37+5:302022-10-03T16:51:40+5:30

Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘संभाषण’ या संशोधन-पत्रिकेतर्फे ‘द कोव्हिड स्पेक्ट्रम: थिओरॅटिकल अँड एक्सपेरिमेंटल रिफ्लेक्शनस फ्रॉम इंडिया अँड बियाँड’ या महत्वपूर्ण पुस्तकाचे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले.

Publication of a book on the Corona epidemic by the Conversation Magazine of Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या संभाषण नियतकालिकातर्फे कोरोना साथीवरील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई विद्यापीठाच्या संभाषण नियतकालिकातर्फे कोरोना साथीवरील पुस्तकाचे प्रकाशन

googlenewsNext

- सीमा महांगडे 

 मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेमार्फत चालविण्यात येणाऱ्या ‘संभाषण’ या संशोधन-पत्रिकेतर्फे ‘द कोव्हिड स्पेक्ट्रम: थिओरॅटिकल अँड एक्सपेरिमेंटल रिफ्लेक्शनस फ्रॉम इंडिया अँड बियाँड’ या महत्वपूर्ण पुस्तकाचे वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचे हस्ते ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात कोरोना महामारीवरील सैद्धांतिक/तात्विक आणि अनुभवजन्य/मानसिक प्रतिसादांचा समावेश करण्यात आला आहे. पाच खंडांतील सोळाहून अधिक देशांतील विविध क्षेत्रातील तत्त्वज्ञ, विचारवंत, सामाजिक शास्त्रज्ञ, कलावंत, मानसशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि थेरपिस्ट अशा विविध मान्यवरांनी या पुस्तकासाठी योगदान दिले आहे. पुस्तकाचे संपादन प्रा. कंचना महादेवन, तत्वज्ञान विभाग, प्रा. सतिश चंद्रकुमार, उपयोजित मानसशास्त्र आणि समुपदेश विभाग, प्रा. मेहेर भूत, जर्मन विभाग आणि प्रा. राजेश खरात, माजी अधिष्ठाता, मानव्यविद्याशाखा यांनी केले आहे तर हे पुस्तक स्पिकिंग टायगर, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केले आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्यदलात प्रथम महिला ले. जनरल असण्याचा मान मिळविणाऱ्या डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक या लाभल्या होत्या. तर सन्माननीय अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख आणि अध्यक्ष म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के हे उपस्थित होते.  

कोव्हिड-१९ या साथरोगाच्या प्रादुर्भावामुळे विविध क्षेत्रे प्रभावित झाली आहेत. अशा विविध क्षेत्रातील अनुभव आणि त्याची सैध्दांतिक मांडणी, विवेचन आणि विश्लेषण या पुस्तकात करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्र आणि त्यातील आव्हाने, सायबर क्षेत्रे, सार्वजनिक धोरणे अशा विविध विषयांचा सैद्धांतिक विभागात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्लोव्हेनियातील तत्वज्ञ स्लावोज झिझेक यांनी जीवशास्त्रीय आणि डिजिटल अशा दोन्ही प्रकारच्या विषाणूच्या परिस्थितींवर चिंतन केले आहे. तर अनुभवात्मक विभागात मानसशास्त्रज्ञ आणि थेरपिस्ट एकाकी आणि अविभाज्यपणे संबंधित असण्याच्या जटिल परिस्थितीबाबत मांडणी करण्यात आली आहे. साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी वापरण्यात आलेले विविध प्रयोग आणि सराव यांच्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे असे डॉ कानिटकर यांनी या पुस्तकाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच हे पुस्तक म्हणजे जागतिक स्तरावर साथीच्या आजाराच्या ऐतिहासिक काळाचे दस्तऐवजीकरण करणारे असल्याचे सांगितले.

कोविड-१९ या साथीच्या रोगाची युद्धाशी आणि डॉक्टरांची सैनिकांशी तुलना करीत, शत्रू अदृश्य- एक अदृश्य विषाणू असल्यामुळे ही लढाई कशी तीव्र झाली याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी या पुस्तकाचे नॉन-क्लिनिकल दृष्टिकोनातून साथीच्या रोगापासून बचाव करण्याच्या सूक्ष्म-स्तरीय कथांबद्दल कौतुक केले. तसेच शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांकडे लक्ष वेधून व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या गरजेवर भर दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. दिगंबर शिर्के यांनी मुंबई विद्यापीठाच्या मानव्यविद्या शाखेमार्फत प्रकाशित केलेल्या या महत्वपूर्ण पुस्तकाचे कौतुक करून सर्व लेखकांचे आणि संपादकांचे अभिनंदन केले. कोव्हिड-१९ या साथरोगाने जगभरातील राष्ट्रांना त्यांच्याकडे असलेल्या आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविंधाबाबत वास्तवाची जाणीव करून दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हे पुस्तक दीर्घकाळ एक ऐतिहासिक संदर्भग्रंथ म्हणून ग्रंथालयात ठेवण्यात यावे असे यावेळी अनेक मान्यवरांनी सुचविले. 
2

Web Title: Publication of a book on the Corona epidemic by the Conversation Magazine of Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.