Join us

'पॉप्युलर प्रकाशन'द्वारे कमल देसाई यांच्या अप्रकाशित साहित्याचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2023 2:05 PM

कमल देसाई ह्या एकोणीसशे पन्नासनंतरच्या मराठी कथात्म साहित्यातील एक महत्त्वाच्या कथाकार आहेत.

कमल देसाई ह्या एकोणीसशे पन्नासनंतरच्या मराठी कथात्म साहित्यातील एक महत्त्वाच्या कथाकार आहेत. १९४८ पासून त्यांच्या कथालेखनाला प्रारंभ झाला. १९४८च्या 'वाङ्मयशोभा'च्या अंकामध्ये त्यांच्या ‘कैफियत’ आणि ‘उधाण’ या दोन लघुकथा प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर २००४ पर्यंतची ५०-५५ वर्षे त्या सातत्याने कथालेखन करीत राहिल्या. कथाकार म्हणूनच त्यांची सर्वश्रुतता आधिक्याने असली तरी त्या एक संवेदनशील कवयित्रीही होत्या. 

'पॉप्युलर प्रकाशन'द्वारे प्रकाशित होणारे ‘रंगकमल’ हे पुस्तक म्हणजे कमल देसाई यांच्या असंग्रहित कथा आणि अप्रकाशित कवितांचा एक परिपूर्ण संच आहे. त्यांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासक आणि त्याच विषयात पीएचडी प्राप्त केलेल्या डॉ. प्रिया जामकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. ‘स्त्री आणि तिचे भावविश्व’ याभोवती कमल देसाई यांच्या बहुतांश कथांचे कथानक गुंफलेले असले, तरी एकूणच सर्व मनुष्यांस अनुभवास येणारे एकाकीपण, प्रेमद्वेषद्वंद्व, त्यांना असलेली मुक्ततेची-स्वशोधाची आस यांसारख्या अनेकविध भावनिक आंदोलनांचे त्यांच्या कथांतून दर्शन घडते. कथा-कादंबऱ्यांप्रमाणेच कमल देसाईंकडून कविता-लेखनही झालेले आहे. अर्थात त्यांच्या कुठल्याच कविता आजमितीस प्रसिद्ध झालेल्या नाहीत. आणि त्या कवितांची संख्याही फार मोठी नाही. केवळ सोळाच कविता त्यांनी त्यांच्या एकंदरीत लेखन-कारकिर्दीत लिहिल्या आहेत. असे असले तरी त्यांच्या या कवितांची दखल घेणेही महत्त्वाचे ठरते.

डॉ. प्रिया जामकर यांच्या मते, एखाद्या चित्रकाराने आपल्या स्केचबुकमध्ये आधी नुसती स्केचेस करावीत आणि नंतर त्यांचं पेंटिंग करावं तसं कमल देसाईंच्या कविता आणि त्यांचं कथात्म साहित्य यांचं नातं आहे. 'रंगकमल'च्या पुस्तक-संपादनासोबतच प्रिया जामकर यांनी कथा आणि कविता या दोन्ही विभागांना अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही लिहिल्या आहेत. 'रंगकमल' हे पुस्तक १५ जूनपर्यंत सर्व वाचकांना उपलब्ध होणार असून ॲमेझॉनवर त्याचे प्रिऑर्डर बुकिंग सुरू झाले आहे. 

टॅग्स :मुंबई