मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२३ मध्ये झालेल्या 'अर्थसंकल्पीय अधिवेशन' काळात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केलेल्या कामकाज अहवालाचे आणि ११ ते २१ एप्रिल २०२३ दरम्यान झालेल्या 'जपान अभ्यास दौऱ्या' त तेथील पर्यटन, सामाजिक विकास, उद्योग संधी याविषयी केलेल्या कामकाजाच्या अहवालाचेही मातोश्रीवर बुधवारी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, 'या दोन्ही अहवालांचे प्रकाशन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे, ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आपल्यामुळेच जपानला जाण्याची संधी मिळाली असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी आवर्जून सांगितले. जुलै २०२३ मध्ये होणाऱ्या विधी मंडळाच्या अधिवेशनासाठी डॉ. गोऱ्हे यांनी त्यांना निमंत्रित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुढील कार्यासाठी डॉ. गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी आ. दुष्यंत चतुर्वेदी, शिवसेना पदाधिकारी भाऊ कोरगावकर, रवी म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.