विचारांचे मंथन! ‘समरसॉल्ट’ काव्यसंग्रहाचे प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 11:01 AM2021-09-10T11:01:26+5:302021-09-10T11:06:57+5:30
‘समरसॉल्टमध्ये आपल्याला विचारांचे मंथन दिसते. दृष्टी पासून दृष्टिकोनापर्यंतचा हा प्रवास आहे.
मुंबई - समर देवकते उर्फ देव कलाम यांनी लिहिलेल्या ‘समरसॉल्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन विक्रोळी येथील लोकशाहीर विठ्ठल उमप कलाकेंद्रात ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राकेश शिर्के, लेखिका मानसी चिटणीस, साठ्ये महाविद्यालयाचे माध्यम विभाग प्रमुख गजेंद्र देवडा आणि मुंबई विद्यापीठातील उर्दूचे प्राध्यापक झाकीर खान हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
प्रेमानंद गज्वी यांनी देव कलाम यांना त्याच्या पहिल्यावहिल्या पुस्तकाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नव्या पिढीचा काव्यकार म्हणून गज्वी यांनी देव कलाम यांना त्याच्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ‘कविता हा साहित्यप्रकार पटकन व्यक्त होण्यासाठी उत्तम आहे, पण जो विचार कवितेत मावत नाही, त्या विचाराला अभिव्यक्त करण्यासाठी कथा, कादंबरी, नाटक या साहित्यप्रकाराचा आधार घ्यावा लागतो, भविष्यात देव कलामने अशा साहित्यप्रकारांना हाताळूनही अभिव्यक्त व्हावे’, असे गज्वी यावेळी म्हणाले आहेत.
‘समरसॉल्टमध्ये आपल्याला विचारांचे मंथन दिसते. दृष्टी पासून दृष्टिकोनापर्यंतचा हा प्रवास आहे. जुन्या कल्पना, रुढी यांची पट्टी बाजूला केल्याशिवाय नव्या प्रकाशाची ओळख कशी होणार? ही होणारी ओळख नव्या वाटा दाखवते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक घटनेची संवेदना मनात उमटू लागते’, असे मत या काव्यसंग्रहाबद्दल बोलताना राकेश शिर्के यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या कविता काव्यसंग्रहाबद्दल बोलताना कवी देव कलाम म्हणतात, ‘समरसॉल्ट हा केवळ एक कवितासंग्रह नाही, तर हीच माझी वैचारिक भूमिका आहे. हीच माझी राजकीय, सामाजिक, धार्मिक भूमिका आहे.’
काव्यसंग्रहाचे नाव – समरसॉल्ट
कवी – देव कलाम (समर देवकते)