Join us

मारहाणीच्या घटनेमुळे प्रचार थंडावलेलाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 4:23 AM

मुंबई : भाजपअंतर्गत दोन गटांत झालेल्या राड्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या घाटकोपर (पूर्व) विधानसभा मतदारसंघात मतदानाला सहा दिवसांचा अवधी उरला ...

मुंबई : भाजपअंतर्गत दोन गटांत झालेल्या राड्यामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या घाटकोपर (पूर्व) विधानसभा मतदारसंघात मतदानाला सहा दिवसांचा अवधी उरला असला तरी अद्याप निवडणुकीची रंगत निर्माण झालेली नाही. या मतदारसंघात आतापर्यंत भाजपसहित कोणत्याही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची एकही सभा झालेली नाही. शिवाय प्रबळ विरोधकांचीही वानवा स्पष्टपणे जाणवत आहे. येथे प्रचाराची हवाच निर्माण झाली नसल्याची सद्य:स्थिती आहे.उमेदवारी कापल्याने नाराज झालेले माजी मंत्री प्रकाश मेहता, इच्छुक प्रवीण छेडा यांचे गट भाजप उमेदवार पराग शाह यांच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय झालेले नाहीत.

४ आॅक्टोबरचा ‘तो’ अपवाद वगळता या मतदारसंघात निवडणुकीच्या दृष्टीने काहीच वातावरण जाणवत नाही. कॉँग्रेसने नवखा उमेदवार दिल्याने त्यांना मतदारापर्यंत संपर्क साधण्यातील मर्यादा दिसून येत आहेत. आर्थिकदृष्ट्या भक्कम असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्व प्रकारचे फंडे त्यांच्याकडून आजमाविले जात आहेत.

कॉँग्रेसने गुजराती उमेदवार न देता मनीषा सूर्यवंशी या मराठी महिलेला संधी दिली आहे. मराठा आरक्षण मोर्चावेळी त्यांनी महिलांची आघाडी समर्थपणे सांभाळली होती. कॉँग्रेसमध्ये नेते व कार्यकर्त्यांचाही अभाव असल्याचे प्रचारातून दिसून येत आहे.

मनसेने या ठिकाणी सतीश पवार या सक्रिय कार्यकर्त्याला संधी दिली असून ते मराठी मतदारांना आकर्षित करण्यात प्रयत्नशील आहेत. भाजपअंतर्गत गटबाजी उघडपणे चव्हाट्यावर आल्याने मेहता यांचा आपल्याला छुपा पाठिंबा असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी मेहता यांनी पूर्वीच्या एका कार्यक्रमात सतीश पवार यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढलेले व्हिडीओ क्लिप व्हायरल केली जात आहे. वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी विकास पवार या कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेले पवार आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह प्रचारात मग्न आहेत.घराणेशाहीचा मुद्दा प्रचारातमुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसच्या गायकवाड घराण्याचे वर्चस्व असलेल्या धारावी मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी या वेळी तिरंगी लढत होत आहे. विद्यमान आमदार वर्षा गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे आशिष मोरे व एमआयएमचे मनोज संसारे रिंगणात आहेत.गायकवाड यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांंनी प्रचारसभा घेतल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. १९९५ चा अपवाद वगळता १९८५ पासून सातत्याने एकनाथ गायकवाड व वर्षा गायकवाड यांनी या मतदारसंघात विजय मिळविलेला आहे़ त्यानंतर त्यांना आव्हान देणारा उमेदवार येथ्े उभा राहिला नाही़ अखेर यंदाच्या निवडणुकीत शिवसेना व एमआयएमच्या उमेदवारांनी प्रचारातून गायकवाड यांना आव्हान दिले आहे.गेल्या ३५ वर्षांत गायकवाड कुटुंबीयांनी धारावीकरांचे प्रश्न सोडविण्याऐवजी स्वत:चा विकास केला, असा मुद्दा विरोधकांनी प्रचारात आणला़ एकनाथ गायकवाड आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने त्यांच्यासमोर ही जागा टिकविण्याचे आव्हान आहे. त्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली आहे़ त्यामुळे येथून कोण विजयी होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़लेबर कॅम्पमध्ये राहणारे शिवसेनेचे उमेदवार आशिष मोरे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले असून त्यांची उमेदवारी शेवटच्या टप्प्यात जाहीर झाल्याने त्यांना सुरुवातीचे काही दिवस शिवसैनिकांशी जुळवून घेण्यात वेळ लागला. आता मोरे यांनी प्रचारात वेग घेतला असून त्यांच्या प्रचाराचे समन्वय करण्याची जबाबदारी ‘मातोश्री’वरून साईनाथ दुर्गे व सहकाऱ्यांवर देण्यात आली आहे.पत्नी नगरसेविका असल्याने प्रभागातील विकासकामांचा लाभ मिळेल, असा त्यांचा दावा आहे़ माजी नगरसेवक मनोज संसारे एमआयएमतर्फे लढत असल्याने या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे. संसारे यांना बहुजन वंचित आघाडीने पाठिंबा दिला आहे.त्यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी सभा घेऊन गायकवाड व काँग्रेसचा समाचार घेतला. हा राखीव मतदारसंघ असून मुस्लीम, उत्तर भारतीय, दलित मतदारांचे प्रमाण फार मोठे आहे. संसारे यांनी दलित व मुस्लीम मतांवर लक्ष ठेवून प्रचारात मुसंडी मारली आहे.

टॅग्स :गोरेगाव