Join us

मुलांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठीच्या मार्गदर्शन सूचनांना प्रसिद्धी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 4:05 AM

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देशलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांना ...

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी असलेल्या मार्गदर्शक सूचनांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला गुरुवारी दिले.

लहान मुलांना कोरोनच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ‘काय करावे आणि काय करू नये’ याची माहिती प्रादेशिक वृत्तवाहिनीवर द्यावी. सगळ्यांपर्यंत विशेषतः ग्रामीण भागात ही माहिती पोहोचेल, याची खबरदारी घ्या, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले.

बालरोग व अन्य आजारांशी निपटण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती केल्याची माहिती राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.

अलीकडेच जिल्हा आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह ६५ हजार आशा कर्मचाऱ्यांबरोबर यासंदर्भात व्हीसी घेण्यात आली. लहान मुलांमध्ये असलेली कोरोनाची लक्षणे, संसर्ग थांबवण्याची पद्धत, ऑक्सिमीटरचा वापर इत्यादी बाबींविषयी त्यांच्याकडे चर्चा करण्यात आली. राज्य सरकारने बैठकीत केलेले प्रेझेंटेशन उत्तम आहे. मात्र, याला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी द्या. मराठी वृत्तवाहिन्यांवरून माहिती द्या, असे न्यायालयाने नमूद केले.

कोरोना संदर्भातील गैरव्यवस्थापनाबाबत करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी होती. आता या याचिकांवरील सुनावणी १६ जून रोजी ठेवण्यात आली आहे.

........................................