मुंबई : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने १ आॅगस्ट, २०१९ रोजी त्यांचे टपाल तिकीट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विशेष साहाय्य योजनांचा आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी १०० कोटींचा निधी राखून ठेवला असल्याचे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. विशेष साहाय्य अंतर्गत येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधील लाभार्थींना दर दोन महिन्यांनी नियमित अनुदान मिळेल, अशी व्यवस्था विभागाने तत्काळ करावी, अनुदानापासून गरीब जनतेस, निराधार जनतेस वंचित ठेऊ नये. विशेष साहाय्य योजनांचे लाभार्थी, त्यांची नावे आणि याद्या या सगळ्या बाबी संगणकीकृत कराव्यात, असेही ते म्हणाले.
‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकीट प्रकाशित करणार’
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:18 AM