आचारसंहितेपूर्वी जाहीर करा भरती परीक्षा; स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 06:39 AM2024-02-19T06:39:11+5:302024-02-19T06:39:44+5:30
आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रखडणार असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयही वाढत आहे.
दीपक भातुसे
मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्च महिन्यात जाहीर होणार असून त्यापूर्वी राज्यातील रखडलेली शासकीय नोकरभरतीची परीक्षा जाहीर करावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे राज्यातील लाखो विद्यार्थी करत आहेत. आचारसंहिता जाहीर झाली की शासकीय भरती रखडणार असून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयही वाढत आहे. त्यामुळे शासकीय नोकरीपासून वंचित राहू, अशी भीती या विद्यार्थ्यांना वाटत आहे.
राज्य शासनाच्या विविध विभागांमधील अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. यातील ७५ हजार पदांची भरती १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत केली जाईल, अशी घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अनेक शासकीय विभागांच्या भरतीची जाहिरातही प्रसिद्ध झालेली नाही. तर ज्या विभागांच्या परीक्षा झाल्या आहेत, त्यातील काही विभागांचे निकाल रखडले आहेत, तर काही विभागांनी जाहीर केलेले निकाल वादग्रस्त ठरले आहेत. या सगळ्या गोंधळाचा फटका शासकीय नोकरीचे स्वप्न पाहून मेहनतीने अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे.
शासनाने राहिलेल्या सरळसेवा पदांच्या जाहिराती आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी प्रसिद्ध कराव्या यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. लवकरच यासंदर्भात आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार आहोत.
- महेश घरबुडे, कार्याध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती