Join us

लॉरीखाली चिरडलेल्या मुलाचा मृत्यू पाहून पुजाऱ्याने सोडले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 6:14 AM

देवेंद्र हे सायन कोळीवाडा येथील ओम शक्ती हाउसिंग सोसायटीत कुटुंबीयांसोबत राहयाचे.

मुंबई : दोन दिवसांपूर्वी वडिलांसोबत स्कूटरवरून निघालेल्या ९ वर्षांच्या मुलाचा लॉरीच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. हा अपघात पाहून तेथून जात असलेले पुजारी देवराज देवेंद्र (३५) यांना मानसिक धक्का बसला. याच धक्क्यातून मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.

देवेंद्र हे सायन कोळीवाडा येथील ओम शक्ती हाउसिंग सोसायटीत कुटुंबीयांसोबत राहयाचे. सोसायटीजवळच असलेल्या मंदिरात ते पुजारी होते. १८ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास ते नेहमीप्रमाणे सोसायटीतून मंदिराकडे जाण्यासाठी निघाले. त्याच दरम्यान, धोबीघाट येथील रहिवासी असलेले मनीष कनोजिया हे मुलगा रणजीत (९) याच्यासोबत स्कूटरवरून जात होते. लॉरीच्या धडकेत त्यांच्या स्कूटरचा अपघात झाला. या अपघातात रणजीत लॉरीच्या चाकाखाली आला. त्यात त्याचा मत्यू झाला तर मनीष गंभीर जखमी आहेत.

देवेंद्र यांचे नातेवाईक मुरगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पाहून देवेंद्र यांना मानसिक धक्का बसला. ते चक्कर येऊन तेथेच कोसळले. त्यांचा रक्तदाबही कमी झाला. त्यांना तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.