पुजीत अगरवालला पुन्हा अटक; ३ कोटींचा गंडा
By admin | Published: October 7, 2016 05:27 AM2016-10-07T05:27:31+5:302016-10-07T05:27:31+5:30
तब्बल ५२ कोटींच्या अपहार प्रकरणातील संशयित आॅरबिट कार्पोरेशनचा कार्यकारी संचालक पुजीत अगरवाल याला, आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने फसवणुकीच्या अन्य गुन्ह्यात अटक केली.
मुंबई : तब्बल ५२ कोटींच्या अपहार प्रकरणातील संशयित आॅरबिट कार्पोरेशनचा कार्यकारी संचालक पुजीत अगरवाल याला, आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेने फसवणुकीच्या अन्य गुन्ह्यात अटक केली. आयडीबीआय बॅँकेला बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी, त्याला गुरुवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता, त्याला २० आॅक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आॅरबिट कार्पोरेशनच्या माध्यमातून विविध वित्तीय संस्था व गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घातल्याप्रकरणाचा तपास, आर्थिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सुरू आहे. यातील प्रमुख सूत्रधार पुजीत अगरवाल याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याबाबत आणखी तक्रारी येत असून, त्याबाबत स्वतंत्रपणे गुन्हे दाखल केले जात आहेत. आयडीबीआय बॅँकेकडे बनावट कागदपत्रे सादर करून ३ कोटीचा गंडा घातल्याप्रकरणी, त्याला स्वतंत्रपणे तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)