Pulwama Attack: बदल्याची भाषा कृतीत उतरवा, पाकिस्तानला ठोकून काढा, सामनातून शिवसेनेची मोदींकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 07:38 AM2019-02-16T07:38:56+5:302019-02-16T07:40:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घडीला विरोधकांवरील हल्ले थांबवून पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा कृतीत उतरवावी. पाकिस्तानला ठोकून काढावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील अग्रलेखातून केली आहे.
मुंबई - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर देशभरात तीव्र संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घडीला विरोधकांवरील हल्ले थांबवून पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याची भाषा कृतीत उतरवावी. पाकिस्तानला ठोकून काढावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनातील अग्रलेखातून केली आहे. तसेच ही राजकारण करण्याची वेळ नाही. तर जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे, असे आवाहनही या अग्रलेखातून करण्यात आले आहे.
सामनाच्या आजच्या अग्रलेखात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात, '' जागतिक पातळीवर ‘एकटा’ पडलेला पाकिस्तान भारतात घुसून आमच्यावर भयंकर हल्ले करीत आहे. मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पाहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा. पाकिस्तानला ठोकून काढा! ठोकून काढा!! ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे.''
सामनाच्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे
- दहशतवादी हल्ल्यात आपल्या 40 जवानांनी बलिदान दिले आहे. कश्मीरची भूमी पुन्हा एकदा भारतीय जवानांच्या रक्ताने भिजली आहे.
- कश्मीर आमचे आहे असे गेल्या सत्तर वर्षांपासून घशाच्या शिरा ताणून सांगितले जात आहे. त्या आमच्या कश्मीरात आमच्याच जवानांच्या हत्या का सुरू आहेत? पंडित नेहरूंपासून आज नरेंद्र मोदींपर्यंत परिस्थिती बदलण्याऐवजी बिघडतच चालली आहे.
- हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या लाटांनी काय होणार? देशात अशा लाटा कधी संतापाच्या असतात तर कधी राजकीय विजयोन्मादाच्या असतात. त्या लाटांच्या तडाख्यांनी ना कश्मीर प्रश्न सोडवला ना जवानांची बलिदाने रोखली.
- उरी’चा हल्ला भयंकर होता, त्यापेक्षा ‘पुलवामा’चा हल्ला खतरनाक आहे.
- उरी हल्ल्याचा बदला म्हणून एक ‘सर्जिकल स्ट्राइक’ नावाचा प्रयोग केला. त्या सर्जिकल स्ट्राइकने पाकिस्तान व त्याच्या अतिरेकी बगलबच्च्यांना धडा मिळाला असे ढोल वाजवले, पण ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातील शौर्याचे सर्व श्रेय घेऊनही कश्मीरात हल्ले व पाकडय़ांचा अतिरेकी प्रकार थांबलेला नाही.
- ट्रम्प हे मोदींचे सच्चे दोस्त असतील तर त्यांनी ‘लादेन’प्रमाणेच मसूद अजहरचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेचे कमांडोज पाकिस्तानात घुसवायला हवेत
- मोदी यांना आमचे हात जोडून एकच सांगणे आहे, पुढचे काही दिवस विरोधकांवरील हल्ले थांबवा आणि पाकिस्तानवरील हल्ल्यांचे पाहा. बदला घेण्याची भाषा केलीच आहे, ती कृतीत उतरवून दाखवा.
- ही राजकारण करण्याची वेळ नाही. जवानांच्या पाठीशी देशाने उभे राहण्याची वेळ आहे.