सुशील कदम, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरात सतत कुठे ना कुठे रस्त्यावरून, नाल्यालगत ड्रेनेजचे पाणी बाहेर येत असते. या पाण्यामुळे परिसर विद्रूप होतोच; शिवाय डासांची पैदास वाढून रोगराई पसरण्याची भीती असते. वडाळा आणि सायन येथे या समस्येने उग्र स्वरूप धारण केले असून, महापालिकेने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सायन अल्मेडा कंपाउंड येथील रस्त्यावर ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेला कित्येक वेळा कल्पना दिली आहे मात्र, समस्या आहे तशीच आहे. यामुळे घाणीचे साम्राज्य पसरून रोगराई पसरेल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
वडाळा कोकरी आगार येथील मोठ्या नाल्यालगत घाणरडे पाणी परिसरात वाहत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ही अडचण आहे. परिसर अस्वच्छ झाल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.