पुंडलिक वरदे... हरी विठ्ठल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 01:55 AM2018-07-17T01:55:00+5:302018-07-17T01:55:12+5:30
सकाळी ८ची वेळ होती... सोहम दिसला... तो अॅनिमेशन कंपनीत काम करतो.
- रोहित नाईक
सकाळी ८ची वेळ होती... सोहम दिसला... तो अॅनिमेशन कंपनीत काम करतो. त्याला आॅफिससाठी युनिफॉर्म नसल्याने, अजूनही तो कॉलेज स्टाईलमध्येच पाहायला मिळतो. आताही तो मस्त फंकी जिन्स - टीशर्ट, स्पोर्टी बॅग, कॅप अशा कूल लूकमध्ये आणि हायफंडू हेडफोन लावून चालला होता... दोन-तीन हाका मारूनही त्याने लक्ष न दिल्याने तो ‘हेडफोन’ किती भारी असेल, याची कल्पना आली. त्यामुळे नेहमीप्रमाणे टपली दिली आणि थांबविलं.म्हटलं, ‘किती मोठ्या आवाजात गाणी ऐकतोयस? कोणत्या मूव्हीची आहेत...’ तर म्हणाला, ‘अरे मूव्ही वैगरे काही नाही, संत तुकारामांचे अभंग ऐकत होतो...’ मी दचकलोच. एवढा टकाटक गेटअप, त्यात हायफंडू हेडफोन आणि चक्क अभंग ऐकतोय हा... मी दोन वेळा विचारलं, नुसतं विचारलंच नाही... तर हा काय ऐकतोय हे चेकही केलं. अभंग ऐकण्याचे कारण विचारले, तर म्हणाला, ‘अरे आषाढी एकादशी येतेय ना, त्यामुळे सध्या हेच सुरू आहे..’ ओके आता आलं सगळं लक्षात. मग त्यानंतर आम्ही गप्पा मारतंच स्टेशनला गेलो.आषाढी एकादशी... नुसतं ऐकलं की सर्वात आधी विठ्ठलाच्याही अगोदर ‘वारकरी’ डोळ्यांसमोर उभे राहतात. वारकरी म्हटलं की, ५०-६० वर्षांची व्यक्ती सदरा-पायजमा घातलेली, हातात वीणा धरलेली, कपाळाला चंदन लावलेली अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते, परंतु यात तरुणांची उपस्थितीही लक्षणीय असते. बहुतेक तरुण हे ग्रामीण भागातीलच असतात, पण आता सोहमच्या निमित्ताने शहरातील ‘युथ’च्या मनातील विठुराया कसा आहे, हेच जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आषाढीनिमित्त शहरांतील शाळांतूनही दिंडी निघते. कॉलेजेसमध्येही विविध स्पर्धा होतात. काही जण आपल्या शाळेच्या दिंडीत आवर्जून सहभागी होतात. त्या निमित्ताने का होईना, पुन्हा एकदा ‘शाळकरी’ बनण्याची संधी मिळते. यंगिस्तानच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास, आमच्या डिक्शनरीमध्ये ‘उपवास’ हा शब्द शक्यतो नसतोच, पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक जण (न चुकता) उपवास करतात. नेहमी ‘वेस्टर्न म्युझिक’ ऐकणाऱ्या कानांना या दिवशी अभंग - ओव्या प्रसन्न ठेवतात. प्रत्यक्षात वारीत जाण्याची इच्छ असली, तरी जॉब - कॉलेजमुळे तिथे जाता येत नाही, पण यावरही उपाय काढत टीव्ही आणि इंटरनेटद्वारे घरबसल्या पंढरीची वारी होतेच. मुंबईसाठी तर प्रत्यक्ष पंढरपूर जरी दूर असले, तरी वडाळ्याच्या ‘प्रतिपंढरपूरमध्ये’ तरुणाईची गर्दी पाहायला मिळेल. रोजच्या धावपळीमध्ये घराशेजारील मंदिरातही जायला वेळ मिळत नाही, पण देवापासून दूर जातील ते कॉलेजियन्स कसले? शेवटी एक्झामसारख्या अडीअडचणींच्या दिवसांत त्याचाच धावा करावा लागतो. सोशल मीडियावरही अनेकांनी आपल्या प्रोफाइलवर आषाढी एकादशीचे वातावरण तयार केले आहे. आज कित्येक तरुण ‘वारकरी संप्रदाय’ विद्यालयातून पदवी प्राप्त करत आहेत. यामुळे एक मात्र नक्की, जरी तरुणाई प्रत्यक्षात पंढरपूरपासून दूर असली, तरी ‘विठुराया’ त्यांच्या मनात नक्कीच विसावला आहे. या निमित्ताने काही तरुणांनी आषाढी एकादशीनिमित्त ‘लोकमत’कडे प्रतिक्रियाही दिल्या...
>मी आजोबांमुळे एकादशी उपवासाच्या व्रताची सुरुवात केली. शालेय सुट्टीत गावी गेल्यानंतर आजोबांना प्रत्येक एकादशीला उपवास करून हरिपाठ म्हणताना आणि देवळात रात्री भजन करताना पाहिले आहे. मीसुद्ध त्यांच्यासोबत असायचो आणि तेव्हापासून हे व्रत सुरू आहे. आजी-आजोबांच्या संस्कारामुळे मी पूर्णपणे शाकाहारी होऊन त्यांचा वारसा पुढे नेत असल्याचा आनंद आहे. आज मुंबईतल्या धावपळीमध्ये सगळ्याच एकादशीला उपवास करण्याचे कधी-कधी मी विसरतोही, पण आषाढी एकादशी न चुकता पाळतो.
- विवेक धराडे, बोरीवली
>मी एकाही एकादशीला उपवास करत नाही, पण आषाढी एकादशीला न चुकता उपवास करते. रोजच्या धावपळीच्या दिवसाच्या तुलनेत हा दिवस खूप वेगळा आणि प्रसन्न असतो. देवाची पुजापाठ करून झाल्यानंतर खूप शांत वाटत. टीव्हीवरून पंढरपूरच्या बातम्या बघून आपण स्वत: तिथे असल्याचा भास होतो. वारकरºयांचा उत्साह बघण्यासारखा असतो, तसेच परिसरातील शालेय विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेत असल्याने त्यांच्यासोबत गप्पा मारण्यात मजा येते.
- प्राजक्ता जाधव, कांदिवली
मी या दिवशी उपवास करत नाही, पण मंदिराबाहेरील लोकांना वेफर्स, बिस्कीट किंवा लाडू देते. आषाढी एकादशीचे वातावरणच वेगळं असतं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या दिवशी शाळेची खूप आठवण येते. शाळेतल्या विविध स्पर्धांसाठी आमची लगबग असायची, शिवाय माझ्या घराजवळ असलेल्या विठ्ठल मंदिराजवळ एक जत्रा भरायची. आता तशी जत्रा भरत नसल्याने बालपणीच्या अनेक आठवणी या दिवशी ताज्या होत्या.
- दिपाली पडवळकर, भार्इंदर
मी उपवास करत नाही, पण या दिवशी सकाळी डहाणू खाडीमध्ये आंघोळीला जातो. घरी आल्यावर संतांचे अभंग किंवा त्यांच्या गोष्टी वाचतो, शिवाय टिव्हीवर पंढरपूरचे अपडेट घेत असतो. विठुरायाची आरती आणि वारकरºयांचा उत्साह पाहून खूप प्रसन्न वाटते.
- हार्दिक धानमेहेर, डहाणू