पुणे : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयकाविरोधात सार्वजनिक वाहतूक संघटनांनी पुकारलेला बंद गुरुवारी सकाळीच बारगळला. त्यामुळे सकाळची वेळ वगळता नागरिकांवर बंदचा परिणाम झाला नाही. शहरात दुपारी बारानंतर रिक्षा रस्त्यावर येऊ लागल्याने तसेच पीएमपीच्या ताफ्यातील बस नियमितपणे मार्गावर आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली नाही.पुण्यासह राज्यात विविध वाहतुक संघटनांनी प्रस्तावित विधेयकाविरोधात बंद पुकारला होता. मात्र परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी गुरूवारी सकाळीच विविध संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर संघटनांनी बंद मागे घेतल्याची घोषणा केली. पुण्यात रिक्षासोबतच पीएमपी या सार्वजनिक वाहतुक बससेवेचा प्रवाशांकडून अधिक वापर केला जातो. रिक्षा संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतल्याने सकाळी काही काळ नागरिकांची गैरसोय झाली. पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट, शिवाजीनगर तसेच रुग्णालयांबाहेर काही रिक्षा चालकांकडून मीटरला कापड गुंडाळून प्रवासी वाहतुक सुरू ठेवली होती. मात्र त्याबदल्यात प्रवाशांकडून जादा पैसे उकळले जात होते. रुग्णालयांबाहेरही रुग्ण, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांची काही रिक्षा चालकांनी बंदचा फायदा उठवत अडवणुक केली. पुणे स्टेशन परिसरात टॅक्सी चालकांनीही सकाळी बंदमध्ये सहभाग घेत वाहतुक बंद ठेवली. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रिक्षा तसेच टॅक्सीची वाट पाहत बसावे लागले. (वार्ताहर)
पुणे शहरात बंद बारगळला!
By admin | Published: May 02, 2015 5:21 AM