मुंबई - शनिवारी मध्यरात्री पुण्याहून दिल्लीसाठी अकासा कंपनीच्या विमानाने उड्डाण केले आणि काही मिनिटांतच एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याची ओरड विमानात केली. त्यानंतर वैमानिकाने तातडीने मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिग केले. त्यानंतर पोलिसांनी त्या प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या बॅगेत कोणतीही स्फोटक वस्तू आढळून आली नाही.
उपलब्ध माहितीनुसार, शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांनी पुण्याहून दिल्लीकरिता अकासा कंपनीच्या विमानाने उड्डाण केले. त्यावेळी त्या विमानामध्ये १८५ प्रवासी व ६ केबिन कर्मचारी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत एका प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याची ओरड सुरू केली. यामुळे सर्वच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. वैमानिकाने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत विमानातील या प्रकाराची माहिती देत आपद्कालीन लँडिगसाठी परवानगी मागितली. त्याप्रमाणे विमान १२ वाजून ४२ मिनिटांनी मुंबई विमानतळावर उतरले. विमान उतरताच क्षणी विमान तळावरील सुरक्षेसाठी तैनात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांनी विमानामध्ये धाव घेतली तसेच मुंबई पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकालाही याची सूचना दिली होती.
रात्री अडीचच्या दरम्यान बॉम्ब शोधक पथकाने त्या प्रवाशाच्या सामानासह संपूर्ण तपासणी पूर्ण करत विमानामध्ये बॉम्ब अथवा कोणताही स्फोटक पदार्थ नसल्याचा निर्वाळा दिला. दरम्यान, ज्या प्रवाशाने बॉम्बची धमकी दिली होती, त्याच्यासोबत त्याचा एक नातेवाईकही प्रवास करत होता. संबंधित प्रवाशाने छातीत दुखत असल्यामुळे औषध घेतले होते त्यामुळे तो विचित्रपणे बरळत असल्याचे त्याने सांगितले. यानंतर, या प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या तपासणीनंतर सकाळी सहा वाजता या विमानाने मुंबईतून दिल्लीसाठी प्रयाण केले.