Join us

मंत्रालयात बॉम्बचा मेल पाठविणाऱ्या पुण्यातील हॉटेल चालकाला पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 4:06 AM

शिक्षण विभागावरील नाराजीमुळे कृत्यलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शिक्षण विभागाच्या कारभाराला वैतागून मंत्रालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील ...

शिक्षण विभागावरील नाराजीमुळे कृत्य

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शिक्षण विभागाच्या कारभाराला वैतागून मंत्रालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील हॉटेल व्यावसायिकाला मंगळवारी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले. शैलेश नारायण शिंदे (वय ५३) असे त्याचे नाव असून त्याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

मुलाचे शैक्षणिक नुकसान आणि शाळेकडून केल्या जाणाऱ्या बेजबाबदारपणाला वैतागून त्याने धमकीचा मेल पाठविला होता. सोमवारी सायंकाळी केलेल्या या धमकीच्या मेलमुळे पोलीस यंत्रणेची धावपळ उडाली. सर्व परिसर धुंडाळूनही त्या ठिकाणी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने त्यांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. मेलवरून पाठविण्यात आलेला मेसेज अफवा असल्याचे स्पष्ट झाले.

याबाबत अज्ञात व्यक्तीविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मेल पाठविणाऱ्याचा शोध घेतला असता तो पुण्यातील शैलेश शिंदेने पाठविल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला पुणे पोलिसांनी अटक केली होती. सोमवारी त्याला मुंबईला आणण्यात आले. त्याच्या धमकीच्या मेलनंतर तातडीने बॉम्ब शोधक पथकाच्या साहाय्याने सर्व परिसर धुंडाळून काढण्यात आला हाेता. त्यामध्येही काहीही संशयास्पद वस्तू आढळली नाही.

............................................