पुणे-मुंबई रेल्वे सेवा १६ ऑगस्टपर्यंत बंद राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 02:05 AM2019-08-10T02:05:18+5:302019-08-10T02:05:40+5:30
घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
पुणे : घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळे रेल्वेमार्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याची दुरूस्ती करण्यासाठी आणखी आठवडाभराचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वेकडून पुणे-मुंबईदरम्यान धावणाऱ्या सर्व इंटरसिटी गाड्या दि. १६ आॅगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रल्वेची मुंबईवारी आणखी लांबणीवर पडली आहे.
पुणे व मुंबईदरम्यानची रेल्वे सेवा दि. २ आॅगस्टपासून विस्कळीत आहे. शनिवारी रात्री मंकी हिलजवळ रेल्वेमार्गावर मोठी दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. डेक्कन क्वीन, इंटरसिटी, सिंहगड व इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रेल्वेकडून तीन-चार दिवस दररोज गाड्या रद्द झाल्याचे जाहीर केले जात होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
शुक्रवारी रेल्वेने या गाड्या दि. ११ आॅगस्टपर्यंत धावणार नाहीत, असे कळविले होते. पण शनिवारी या तारखांमध्ये पुन्हा बदल करण्यात आला. आता या गाड्यांसह प्रगती व डेक्कन एक्सप्रेसही दि. १६ आॅगस्टपर्यंत मार्गावर येणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे.