मुंबई : उन्हाळी सुट्टीतील गर्दीनिमित्त एसटी आरक्षण आणि गाडीच्या चौकशीसाठी मोठ्या प्रमाणात प्रवाशांची मागणी होत आहे. सुट्टीत प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्यासाठी महामंडळाने मुंबईतील सर्व स्थानकांत ‘पुणे पॅटर्न’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानकांत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांशी प्रवाशांना आता थेट संवाद साधता येणार आहे.
१८००-२२-१२५० हा एसटीचा टोल फ्री क्रमांक आहे. एसटीच्या टोल फ्री क्रमांकावर येणारे फोन घेण्यासाठी खासगी कर्मचारी आहेत. प्रवाशांच्या तक्रारी ऐकून घेत तक्रारींचे निरसन करण्यासाठी या कर्मचाऱ्यांकडून संबंधित स्थानक-आगारातील कर्मचाऱ्यांना संपर्क साधून त्यानंतर संबंधित प्रवाशांना उत्तर मिळत होते. मात्र, ही प्रक्रिया क्लिष्ट आणि वेळखाऊ असल्याने प्रवाशांच्या त्रासात अधिकच भर पडत होते. या पॅटर्नमुळे प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याचे सांगण्यात आले.
काय आहे पुणे पॅटर्न?- संबंधित बसस्थानकातील अधिकाऱ्यांचे क्रमाक थेट प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांनी घेतला होता. - कोरोनानंतर नव्याने याची अमंलबजावणी पुणे विभागातील २४ स्थानकांत करण्यात आलेली होती. - पुणे विभागात हा प्रयोग राबविल्यानंतर महिन्याभरात तब्बल ७० टक्के तक्रारींचे योग्य वेळेत निरसन झाले. यामुळे प्रवाशांना देखील याचा फायदा होत आहे, असे महामंडळाचे म्हणणे आहे.