Join us  

'ड्रग्जमध्ये पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो'; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 12:30 PM

Ravindra Dhangekar : पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. 

Ravindra Dhangekar ( Marathi News ) : ललित पाटील ड्रग्ज रॅकेट, पोर्शे कार अपघात अशा प्रकरणांमुळे पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा हा खेळ सर्वांसमोर आला आहे. पुण्यातील तरुणाई अंमली पदार्थ आणि ड्रग्जच्या विळख्यात सापडल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे.  दरम्यान, आता या प्रकरणावरुन जोरदार राजकारण पेटले आहे. आजपासून विधिमंडळाचे पावासाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या बाहेर काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी पुणे ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे. 

मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय; मुंबई मेट्रो-३ चाही समावेश

आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सरकारवर टीका केली. माध्यमांसोबत बोलताना आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, अंमली पदार्थ विकली जातात यात आता पंजाबनंतर पुण्याचा नंबर लागतो. आज करोडो रुपयांचा अंमली पदार्थ सापडतोय. याचे व्हिडीओ आणि फोटो समोर आल्यानंतर सरकारला जाग येते. एवढ्या दिवस सरकारने बुलडोझर का फिरवला नाही, अधिवेशनात चर्चा होईल म्हणून तात्पुरती एखाद्या हॉटेलवर कारवाई केली, असा आरोपही धंगेकर यांनी केला. 

"आज पुण्यात पब संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही दिवसापूर्वी अल्पवयीन मुलाने दोघांना उडवले यात पोलिसांनी दोन, दोन एफआयआर फाडल्या.  यात पहिल्या एफआयआरमध्ये मुलगा सुटला. दुसऱ्या एफआयआरमध्ये मुलाला ताब्यात घेतले. हा सगळा विचार करता तपास अधिकाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करायला हवा होता. पण, फोजदारी गुन्हा दाखल न करता त्यांना तात्पुरते निलंबित केले आहे. सध्या चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे, असंही आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. 

पुण्याच्या उंबऱ्यावर अंमली पदार्थ

आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. अंमली पदार्थ पुण्याच्या उंबऱ्यावर आला आहे. पुण्याने मोठं मोठे राजकीय नेते दिले आहेत. लाखो विद्यार्थी पुण्यात येतात. पण, पुण्यात पब संस्कृतीमुळे पुणे बदनाम होत आहे. याचा विचार पोलिसांनी केला पाहिजे. रात्री साडेतीन वाजता हे सापडत असेल तर पोलिसांना हे कळले कसे नाही, पोलिसांच्या मेहरबानीमुळे हे चालत आहे, असंही आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले. 

टॅग्स :विधानसभाकाँग्रेसपुणेएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसरविंद्र धंगेकर