Join us

दोन्ही गटात पुण्याला अजिंक्यपद

By admin | Published: December 25, 2015 1:01 AM

राज्य बास्केटबॉल अजिंक्यपद : मुलींत मुंबई साऊथ, तर मुले गटांत ठाणे उपविजेते

वारणानगर : येथे गेल्या पाच दिवसांपासून खेळल्या जात असलेल्या ६६व्या राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात पुणे संघाने प्रतिस्पर्ध्यांवर दोन्ही गटांत नेत्रदीपक विजय मिळवून या राज्य स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. मुले गटात ठाणे संघाला, तर मुलींत मुंबई साऊथला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन व श्री वारणा विविध उद्योग व शिक्षण समूह यांच्यावतीने तात्यासाहेब कोरे क्रीडांगणावर या स्पर्धा खेळवण्यात आल्या.स्पर्धेतील विजेत्या संघांना व खेळाडूंना पुणे विभागाचे महसूल आयुक्त एस. चोकलिंगम, सौ. विजया चोकलिंगम, वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सचिव जी. डी. पाटील, वारणा कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विजयकुमार कोले, सचिव बी. जी. सुतार, प्रांताधिकारी मोनिका सिंह, तहसीलदार रामचंद्र चौबे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.मुलींच्या गटात अंतिम सामना पुणे विरुद्ध मुंबई यांच्यात ६५-५८ असा चुरशीने झाला. पुण्याच्या स्नेहा राजगुरू हिने २७ गुण व शेरीन लिमये हिने २३ गुणांची कमाई करीत संघाला शेवटच्या क्षणी मुंबईवर ७ गुणांची आघाडी घेत पुणे संघास विजेतेपदाकडे नेले.मुलांच्या गटात पुणे संघाने ९४-७२ अशी २२ गुणांनी ठाणे संघावर मात करुन विजेतेपद पटकावले. पुण्याच्या प्रदीप चव्हाण याने सर्वाधिक २९ गुण व सिद्धार्थ शिंदेने २४ गुण नोंदवत संघाला अजिंक्यपद मिळवून देण्यात बाजी मारली. तर ठाणेच्या प्रदीप नागरियाने २० व शुभम यादवने १४ गुण नोंदविले. शेवटी ठाणे संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)