Join us

डबेवाल्यांकडून किंग चार्ल्सला पुणेरी पगडी; पदग्रहण सोहळ्याचं मुंबईत सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 7:21 AM

किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी किंग चार्ल्स यांना पुणेरी पगडी भेट म्हणून पाठवली आहे

मुंबई - ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र किंग चार्ल्स (तिसरे) यांचा येत्या ६ मे रोजी ब्रिटनचे राजे म्हणून राज्याभिषेक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर, जगात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत ब्रिटनच्या उच्चायुक्तांतर्फे मंगळवारी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला किंग चार्ल्स यांचे जवळचे मित्र मानले जाणाऱ्या मुंबईतल्या डबेवाल्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.

विशेष म्हणजे, किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यासाठी डबेवाल्यांनी किंग चार्ल्स यांना पुणेरी पगडी भेट म्हणून पाठवली आहे, तसेच डबेवाल्यांची ओळख असलेली गांधी टोपीदेखील त्यांना भेट दिली. किंग चार्ल्स यांच्या पदग्रहण सोहळ्यानिमित्त मंगळवारी मुंबईतील ताजमहल हॉटेलमध्ये एका आनंद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुंबईतील अनेक प्रतिथयश उद्योजक, महाराष्ट्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी, कॉमनवेल्थ देशांचे कौन्सूल जनरल उपस्थित होते.

यावेळी बोलताना ब्रिटनचे भारतामधील उप-उच्चायुक्त ॲलन गॅमेल म्हणाले की, किंग चार्ल्स यांचा पदग्रहण सोहळा जगभरात साजरा होईल. या कार्यक्रमाला  विविध देशांतील प्रमुख नेते  उपस्थित राहणार आहेत. मुंबईतूनही मोठ्या प्रमाणावर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.