परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास पालिकेकडून जप्तीसह दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 03:26 AM2020-12-17T03:26:42+5:302020-12-17T03:27:07+5:30

नुकत्याच लालबाग येथे झालेल्या सिलिंडर स्फोटात मोठी मनुष्यहानी झाली. अशा घटना घडू नयेत म्हणून पालिकेने पुन्हा एकदा एल.पी.जी. सिलिंडरच्या वापराबाबत सूचना केल्या आहेत.

Punitive action including confiscation from the municipality if more cylinders are found than allowed | परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास पालिकेकडून जप्तीसह दंडात्मक कारवाई

परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास पालिकेकडून जप्तीसह दंडात्मक कारवाई

Next

- सचिन लुंगसे

मुंबई :  मुंबईत सतत आगीच्या घटना घडत असतात, यातील बहुतांश घटना सिलिंडर स्फोटाशी निगडित असतात. नुकत्याच लालबाग येथे झालेल्या सिलिंडर स्फोटात मोठी मनुष्यहानी झाली. अशा घटना घडू नयेत म्हणून पालिकेने पुन्हा एकदा एल.पी.जी. सिलिंडरच्या वापराबाबत सूचना केल्या आहेत. तसेच परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास पालिकेकडून जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

सिलिंडरचा साठा व वापर काळजीपूर्वक करावा. सर्वात पहिला मुद्दा म्हणजे सिलिंडर हे अधिकृत गॅस वितरकाकडून व अधिकृतपणेच खरेदी करावेत. सिलिंडर घेतानाच त्यात लिकेज नसल्याची खातरजमा गॅस कंपनीच्या अधिकृत व्यक्तीकडून करून घ्यावी. गॅस लिकेजची खातरजमा करून गॅस सिलिंडर देणे हे गॅस वितरण कंपनीच्या प्रतिनिधीलाही बंधनकारक आहे. लिकेज असल्यास सिलिंडर बदलून घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले.

सिलिंडरचा साठा करताना, वापरताना ते बंदिस्त जागी ठेवू नयेत. सिलिंडर आडवे ठेवल्यास लिकेज होण्याची शक्यता असते. साठा करताना त्याची सेफ्टी कॅप लावणे आवश्यक आहे. सिलिंडरजवळ ज्वालाग्राही पदार्थ ठेवू नयेत. गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, पाइप, गॅस शेगडी यांची जोडणी करताना अधिकृत व्यक्तीकडूनच करावी. गॅसचा पाइप हा २ मीटरपेक्षा अधिक लांबीचा नसेल याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही पालिकेने केल्या.

एक सिलिंडर, दोन सिलिंडर किंवा दोनपेक्षा अधिक सिलिंडर यांचा एकाच वेळी वापर करायचा असल्यास किंवा साठा करायचा असल्यास तो दिलेल्या परवानगीनुसारच करणे बंधनकारक आहे. दिलेल्या परवानगीपेक्षा अधिक सिलिंडर आढळल्यास त्यावर महापालिकेद्वारे जप्तीची व दंडात्मक कारवाई केली जाते.

अशी काळजी घेणे गरजेचे
गॅसगळती स्वयंचलित पद्धतीने शोधून त्याची सूचना देणारे गॅस लिकेज डिटेक्टर तंत्रज्ञाच्या मार्गदर्शनानुसार बसवून घ्यावे. गळती होत असल्यास शटऑफ व्हॉल्व / रेग्युलेटर बंद करावे. दरवाजे-खिडक्या उघडाव्यात. कोणतेही विद्युत उपकरण किंवा बटन बंद अथवा चालू करू नये. शक्य असल्यास सिलिंडर जमिनीवरील मोकळ्या जागेत नेऊन ठेवावा. गळती झाली असेल तेथून बाहेर पडून सुरक्षित जागी जावे. गळतीबद्दल गॅस कंपनी व अग्निशमन दलास कळवावे, असे आवाहन पालिकेने केले.

Web Title: Punitive action including confiscation from the municipality if more cylinders are found than allowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.