पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई शाखेत 10 हजार कोटींचा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 01:10 PM2018-02-14T13:10:59+5:302018-02-14T13:41:22+5:30
हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे समभाग ४ टक्क्यांनी कोसळले आहेत.
मुंबई: देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या पंजाब नॅशनल बँकेच्या (पीएनबी) मुंबई शाखेत जवळपास 10 हजार कोटींचा ( 1.8 अब्ज डॉलर्स) घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. या घोटाळ्यात सामील असलेल्या व्यक्तींची नावे बँकेने अद्याप जाहीर केलेली नाहीत. मात्र, त्यांची माहिती तपास यंत्रणांना दिली आहे. हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेचे समभाग ४ टक्क्यांनी कोसळले आहेत. बुधवारी सुरुवातीच्या सत्रात बँकेच्या समभागांमध्ये ५.७ टक्क्यांची घसरण नोंदवली होती.
प्राथमिक माहितीनुसार, पंजाब नॅशनल बँकेत काही अनियमित व्यवहार झाल्याची बाब नुकतीच उघड झाली. बँकेतील काही मोजक्या खातेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी हे संशयास्पद व्यवहार सुरू होते. या व्यवहारांमुळे परदेशातील संबंधित खातेदारांना इतर बँकांनी उचल म्हणून काही पैसे दिले होते. सध्या बुडीत कर्जांच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकिंग क्षेत्राला या घोटाळ्यामुळे आणखी एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. याबाबत रिझर्व्ह बँकेने अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
दरम्यान, या सगळ्याचा संबंध उद्योगपती नीरव मोदी यांच्याशी असल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि इतर काही जणांविरोधात ४.४ कोटी डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. दरम्यान, आताच्या प्रकरणाशी या घोटाळ्याचा काही संबंध आहे का, हे अद्याप समजू शकलेले नाही.