मुंबई: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्यामुळे चर्चेत आलेला उद्योगपती नीरव मोदीचे शक्तिशाली राजकारण्यांशी आणि उद्योगपतींशी संबंध असल्याची बाब समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी दावोस येथे पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत असलेल्या शिष्टमंडळात नीरव मोदीचा समावेश होता. यापूर्वी 2016 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबतच्या शिष्टमंडळातही नीरव मोदी दाव्होसला गेला होता. त्यानंतर नीरव मोदीबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. नीरव याचे भारतातील सर्वात श्रीमंत घराणे असलेल्या अंबानी कुटुंबाशी कौटुंबिक संबंध आहेत. धीरुभाई अंबानींच्या नातीचे 2016 मध्ये नीरव मोदीच्या लहान भावाशी लग्न झाले होते. गोव्यामध्ये थाटामाटात हा विवाह सोहळा पार पडला होता. त्यामुळे इतक्या मोठ्या व्यक्तींशी संबंध असलेल्या नीरव मोदीवर सरकार गांभीर्याने कारवाई करणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांची भाची इशिता साळगावकरचे लग्न नीरव मोदीचा लहान भाऊ नीशाल मोदीशी झाले आहे. इशिता ही दिप्ती साळगावकर यांची कन्या आहे. दिप्ती या धीरुभाई अंबानी यांची कन्या आहेत साळगावकर कुटुंबही गोव्यातील मोठे उद्योजक आहेत. एप्रिल २०१६ मध्ये इशिता आणि नीशालचा साखरपुडा मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडला होता. या सोहळ्याला ८० ते १०० जणच उपस्थित होते. नीशाल मोदी हा नीरव मोदीच्या व्यवसायातही सक्रिय असल्याचे समजते. नीरव मोदी हा ४७ वर्षांचा असून त्याचे वडील हे देखील हिरे व्यापारीच होते. व्यवसायानिमित्त ते बेल्जियममध्ये गेले होते. नीरव आणि नीशाल हे दोघे हिरे व्यापार आणि ज्वेलरीशी संबंधित क्षेत्रातच कार्यरत आहेत.