मुंबईत मध्यमवर्गासाठी आणखी एक कॅन्सर रुग्णालय; वैद्यकीय प्रशासनाचा ताण कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:24 PM2023-08-23T12:24:50+5:302023-08-23T12:25:18+5:30
टाटा कॅन्सर रुग्णालयाप्रमाणे परवडणाऱ्या दरात उपचार मिळणार
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही वर्षात कॅन्सरच्या रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, उपचारांचा खर्च वाढला आहे. मुंबईत सध्या टाटा रुग्णालय सोडले तर इतर सर्व रुग्णालये महागडी आहेत. मात्र आता डॉकयार्ड रोडवर मुंबई महापालिकेच्या बंद पडलेल्या रुग्णालयाच्या जागेवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हेड ॲण्ड नेक कॅन्सर इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे नवीन रुग्णालय सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयातील उपचाराचे दर टाटा रुग्णालयासारखेच माफक असल्याने मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार आहे.
कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी देशभरातून रुग्ण टाटा रुग्णालयात येतात. त्यामुळे या रुग्णालयावर अतिरिक्त ताण आहे. येथे मोठी प्रतीक्षा यादी असते. विशेष म्हणजे येथे परवडणाऱ्या दरात कॅन्सरच्या रुग्णांना उपचार मिळतात.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयाचे व्यवस्थापन कॅन केअर ट्रस्टतर्फे पाहिले जाणार आहे. या ट्रस्टचे अध्यक्ष कॅन्सरचे निष्णात सर्जन डॉ. सुलतान प्रधान आहेत. या रुग्णालयात ९७ बेड्स असून, यापैकी २० टक्के बेड्सवर गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार देण्यात येणार आहेत. या रुग्णालयात मौखिक कॅन्सरच्या उपचारासोबत ब्रेस्ट कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरवर उपचार केले जाणार आहेत. या रुग्णालयात टाटा रुग्णालयाचा अनुभव असलेले डॉक्टर उपचार करणार आहेत. त्यामध्ये डॉ. प्रथमेश पै, डॉ. वाणी परमार यांचा समावेश आहे. या क्षेत्रात मोठा अनुभव असलेले डॉ. तपन साकिया हेसुद्धा या रुग्णालयात उपचार करणार आहेत.
महापालिकेसोबत या रुग्णालयाचा ३० वर्षांसाठी करार करण्यात आला आहे. करार संपल्यानंतर आणखी ३० वर्षांपर्यंतचा कालावधी वाढवू शकतो, असे नियोजन करारात केले आहे. येथे केमोथेरपी डे केअर सेंटर असणार आहेत. तसेच १७ मजल्यांच्या इमारतीत कॅन्सरचे अत्याधुनिक उपचार उपलब्ध असतील. गेल्या आठवड्यापासून सेवेसाठी रुग्णालय उपलब्ध झाले आहे.
-रेश्मा नायडू, प्रशासकीय अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालय