मुंबई : भाड्याने घर घेण्याच्या नावाखाली तोतया जवानाने घर मालकाचे खाते रिकामे केल्याची घटना सायनमध्ये घडली. याप्रकरणी वडाळा टी टी पोलिसांनी तोतया जवानाविरोधात गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
सायन परिसरात राहणारे किशोर बोऱ्हाडे (वय ४१) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी घर भाड्याने देण्यासाठी ऑनलाइन जाहिरात दिली होती. १५ सप्टेंबर रोजी एकाने फोन करून तो जवान असल्याचे भासवले.
पुढे विश्वास बसावा म्हणून ओळखपत्रे पाठवली. मुंबईत बदली झाली असल्याने घर पाहिजे असल्याचे सांगितले. त्यांनीही विश्वास ठेवून घर देण्यास तयारी दर्शवली. पुढे पैसे पाठविण्यासाठी ठगाने एक लिंक पाठवली. लिंक ओपन करताच त्यांच्या खात्यातून ४९ हजार ५०० रुपये गेले. नंतर त्यांनी फोन कट केला. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांना संशय आला. थोड्या वेळाने पुन्हा अन्य क्रमांकावरून घरासाठी फोन आला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याबाबत बँकेसह पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.