Join us  

चिमण्यांसाठी विद्यार्थीही सरसावले!

By admin | Published: March 21, 2015 12:45 AM

मुंबईतून चिमण्या हद्दपार होऊ नयेत आणि चिमण्यांसाठी मुंबईकरांनी अधिकाधिक ‘स्पॅरो शेल्टर’ उपलब्ध करून द्यावेत, असा संदेश विद्यार्थी मित्रांनी दिला.

मुंबई : मुंबईतून चिमण्या हद्दपार होऊ नयेत आणि चिमण्यांसाठी मुंबईकरांनी अधिकाधिक ‘स्पॅरो शेल्टर’ उपलब्ध करून द्यावेत, असा संदेश विद्यार्थी मित्रांनी दिला. निमित्त होते ते जागतिक चिमणी दिनाचे. ‘लोकमत’ने या कार्यक्रमाला सहकार्य केले.‘स्पॅरोज शेल्टर’ या संस्थेतर्फे जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधत धारावी येथील शिवाजी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी टी-शर्ट पेंटिंगचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या तब्बल ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमादरम्यान प्रथमत: विद्यार्थी मित्रांनी कोऱ्या कागदावर चिमणीचे चित्र काढून त्यात ब्रशने रंग भरले. त्यानंतर टी-शर्टवर काढण्यात आलेल्या चिमणीच्या चित्रात केवळ हाताच्या बोटांनी रंग भरण्याचे आवाहन करण्यात आल्याने विद्यार्थ्यांची कसोटी लागली. ठिपक्यांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी चिमण्यांमध्ये रंग भरत जणू काही त्यांना जिवंतच केले. दुपारी २ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रंगछटांनी चिमणीचे चित्र पूर्ण करीत चिमण्या वाचविण्याचा संदेश दिला.महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे उपमहासंचालक अविनाश कुबल यांनी या कार्यक्रमाला परीक्षक म्हणून आवर्जून उपस्थिती दर्शविली. विद्यार्थ्यांसमोर केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात कुबल यांनी चिमण्यांसह जंगलांचे महत्त्व विषद केले. शिवाय पर्यावरण वाचविण्यासाठी छोट्या छोट्या प्रयत्नांपासून सुरुवात करावी, असे आवाहन केले. स्पर्धेदरम्यान चिमण्यांची उत्कृष्ट चित्रे काढणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. (प्रतिनिधी)