Join us

वरळीत १८ फ्लॅट्स असणाऱ्या ३ डुप्लेक्स घराची ४२७ कोटींना खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:06 AM

कोरोना काळातही महागड्या घरांच्या खरेदीचा ट्रेंड कायमलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्राला ...

कोरोना काळातही महागड्या घरांच्या खरेदीचा ट्रेंड कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे बांधकाम क्षेत्राला काहीसा फटका बसला असला तरी मुंबईत लक्झरी घरांच्या खरेदीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. वरळी परिसरात पाच मजले व १८ फ्लॅट्सचा समावेश असणाऱ्या तीन डुप्लेक्स घरांची तब्बल ४२७ कोटींना खरेदी करण्यात आली.

रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित रहेजा कुटुंबाने या घराची खरेदी केली आहे. या घरासाठी त्यांनी ६.५४ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे. इमारतीच्या ४१ ते ४५ व्या मजल्यापर्यंत पसरलेल्या या घराचे एकूण क्षेत्रफळ ६६८११ चौरस फूट आहे. या घरासाठी एकूण ४२ चारचाकी वाहनांचे पार्किंग असेल.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात घरविक्री मंदावली होती. तिला पुन्हा चालना देण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्कात तीन टक्क्यांची सवलत दिली होती. २०२१ चा मार्च महिना हा मुद्रांक शुल्क सवलतीचा फायदा घेण्यासाठी शेवटचा महिना होता. या काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात घरखरेदी झाली; तसेच लक्झरी व महागड्या घरांच्या खरेदीचे प्रमाणही वाढले. वरळीतील या घराची खरेदी २०२० च्या डिसेंबर महिन्यात झाली होती. मात्र नोंदणी २०२१ च्या एप्रिल महिन्यात करण्यात आली. या इमारतीत हल्लीच ३० कोटी, ४१ कोटी व ५० कोटींच्या घरांची खरेदी झाली होती. त्यामुळे कोरोनाच्या काळातही मुंबईत महागड्या घरांच्या खरेदीचा ट्रेंड कायम असल्याचे दिसत आहे.

.....................................