Join us  

ब्लॉकचा खरेदीला फटका

By admin | Published: October 13, 2014 3:50 AM

सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि रुळांच्या कामांसाठी मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर लाइन आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात आला

मुंबई : सिग्नल, ओव्हरहेड वायर आणि रुळांच्या कामांसाठी मध्य रेल्वेची मेन लाइन, हार्बर लाइन आणि पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक घेण्यात आला. मात्र या ब्लॉकमुळे दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांना मोठा फटका बसला. लोकल बऱ्याच विलंबाने धावत होत्या. त्यामुळे खरेदी करून घरी निघालेल्या प्रवाशांना स्थानकात सामानासह ताटकळावे लागले आणि लोकलच्या गर्दीलाही तोंड द्यावे लागले. मध्य रेल्वेमार्गावर ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी साडेतीन दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे डाऊन धीमी आणि सेमी फास्ट लोकल मुलुंडनंतर डाऊन जलद मार्गावर मुलुंड ते कल्याण आणि ठाणे ते डोंबिवली स्थानकावर धावत होत्या. ब्लॉकमुळे डाऊन धीम्या मार्गावरील लोकल कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांवर थांबत नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दिवाळीच्या खरेदीसाठी अनेक जण ब्लॉक सुरू होण्यापूर्वीच घराबाहेर पडले होते. मात्र दुपारपर्यंत घरी जाण्यासाठी पुन्हा रेल्वे स्थानक गाठावे लागत असल्याने अनेकांचे हाल झाले. ब्लॉकमुळे लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत असल्याने गर्दीचा सामनाही करावा लागत होता. हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात आल्याने सीएसटी ते पनवेल, बेलापूर आणि वाशीपर्यंतच्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर मानखुर्द ते कुर्ला दरम्यानच्या लोकलही रद्दच करण्यात आल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसटी ते कुर्ला आणि मानखुर्द ते पनवेल अशा विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र त्याचा फायदा प्रवाशांना झाला नाही. पश्चिम रेल्वेमार्गावरही सांताक्रूझ ते महालक्ष्मीदरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी साडे दहा ते दुपारी साडे तीनेपर्यंत जम्बोब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे सांताक्रूझ ते महालक्ष्मीदरम्यान अप धीम्या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावर वळवण्यात आल्या. लोकल दुसऱ्या मार्गावर वळवण्यात आल्याने माटुंगा रोड, एल्फिन्स्टन रोड, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांत लोकल गाड्यांना थांबा देण्यात येत नव्हता. त्याचा फटका प्रवाशांना बसला. दरम्यान खार रोड व माहीम येथे १२ डब्यांच्या लोकलला दुहेरी थांबा देण्यात येत होता. (प्रतिनिधी)